औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयाने नुकताच 'सुंदर माझे कार्यालय' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. यात विविध तालुकास्तरीय कार्यालयाने सहभाग नोंदविला असतानाच आता विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या दिशानिर्देशानुसार ‘माझा गाव, सुंदर गाव’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमात बाेर्डा ग्रामस्थांनी हिरिरीने सहभाग नाेंदविला. स्थानिकांची कल्पकता वापरत गावातील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरणपुरक कार्यक्रम यासह ग्रा.पं.चा कारभार सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे. कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन. पी. राजगुरू, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद कुसनेन्नीवार, विस्तार अधिकारी टी. जे. जाधव, बी. पी. जोगदंड यांच्या टीमने यासाठी तालुक्यात विशेष असे नियोजन केले आहे. त्यांनी केलेल्या आवाहनाला विविध गावांनी प्रतिसाद दिला असून यामध्ये बोर्डा गाव अग्रभागी आहे.
चौकट...
© बोर्डा गावाचा हिरिरीने सहभाग...
कळंब तालुकास्तरावर बोर्डा गावाने ‘माझा गाव, सुंदर गाव’ उपक्रमात मोठ्या हिरिरीने सहभाग नोंदविला आहे. यासंदर्भात नुकताच एक कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी गटविकास अधिकारी एन. पी. राजगुरू, विस्तार अधिकारी बी. पी. जोगदंड, ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष भारत सोनवणे, माजी सरपंच राहुल चव्हाण, बाबूराव शेळके, सुनील पारेकर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थांनी स्वच्छता मोहीम राबविली.
© अभियानाचे स्वरूप स्पर्धात्मक....
‘माझा गाव, सुंदर गाव’ उपक्रमाची तालुकास्तरावर अंमलबजावणी करताना जिल्हा परिषदेच्या वतीने गटनिहाय नियोजन करण्यात येणार आहे. यात सर्व गावांचा सहभाग राहणार आहे. यातून गटनिहाय तीन गावे व त्यामधून तालुकास्तरावर तीन गावे निवडली जाणार आहेत. यामुळे हा उपक्रम एक कालमर्यादित अभियान स्वरूपात व स्पर्धात्मक असा राबविला जाणार आहे.