सचिवाच्या खुर्चीसाठी सदस्यांत रस्सीखेच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:55+5:302021-07-09T04:21:55+5:30
कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील प्रमुख कृषी बाजारपेठ आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होणाऱ्या येथील मोंढ्यावर नियंत्रण ...

सचिवाच्या खुर्चीसाठी सदस्यांत रस्सीखेच?
कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील प्रमुख कृषी बाजारपेठ आहे. कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल होणाऱ्या येथील मोंढ्यावर नियंत्रण बाजार समितीचे असते. अशा या संस्थेवर १८ संचालकांचे कार्यकारी मंडळ कार्यरत आहे. या महत्त्वाच्या बाजार समितीवर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे वर्चस्व आहे.
पदाधिकाऱ्यांसह या समितीच्या सचिव पदालाही चांगलेच वलय आहे. मागच्या काही दिवसांत येथील सचिव ए. बी. खापे हे सेवानिवृत्त झाले आहेत; यामुळे या महत्त्वाच्या खुर्चीवर कार्यरत सेवाज्येष्ठता असलेला कर्मचारी नियुक्त होणार? की पणनच्या पॅनलवरील एखादी व्यक्ती याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ही चर्चा वेग घेत असतानाच मागच्या १० दिवसांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दुसऱ्या जिल्ह्यातील एका व्यक्तीची सचिव म्हणून वर्णी लावण्यासंदर्भात ठरावही झाला अन् तो जिल्हा निबंधकांकडे पाठविण्यात आल्याचे समजते. मात्र, यानंतर संचालक मंडळात यावरून दोन मतप्रवाह निर्माण झाल्याने सचिवांच्या ‘चेअर’वर कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चौकट...
पॅनल की ठराव, सस्पेन्स वाढला...
बाजार समितीच्या सचिवपदी एका व्यक्तीला नियुक्त करावे, असा नावानिशी ठराव घेत तो ‘डीडीआर’कडे पाठवण्यात आला आहे. तेथून तो पणन संचालनालयाकडे जाईल. असे असतानाच काही संचालकांनी यास विरोध दर्शवत नियमाप्रमाणे जाहिरात देऊन किंवा पणन संचालनालयाकडील पॅनलवरील व्यक्ती सचिव म्हणून नियुक्त करावा, असा आग्रह सुरू केला असल्याचे समजते. यामुळे महत्त्वाच्या अशा कळंब बाजार समिती सचिवपदी कोणाची वर्णी लागणार? याचा सस्पेन्स वाढला आहेे.