भूमध्ये काँग्रेसकडून इंधन दरवाढीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST2021-06-21T04:22:01+5:302021-06-21T04:22:01+5:30
भूम : पेट्राेल, डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह वाहनधारक हैराण झाले आहेत. मात्र, केंद्रातील भाजपा सरकार याबाबतीत ...

भूमध्ये काँग्रेसकडून इंधन दरवाढीचा निषेध
भूम : पेट्राेल, डिझेलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह वाहनधारक हैराण झाले आहेत. मात्र, केंद्रातील भाजपा सरकार याबाबतीत चकार शब्द काढायला तयार नाही, असा आराेप करीत काँग्रेसच्या वतीने शहरातील गाेलाई चाैकात निषेध करण्यात आला. सरकारविराेधी घाेषणाबाजी करून दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.
केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी इंधन दरवाढीवरून काँग्रेसला लक्ष्य केले हाेते. प्रत्येक प्रचार सभेत इंधन दरवाढीला काँग्रेस सरकारची धाेरणे जबाबदार असल्याचे सांगून सत्ता हाती दिल्यास इंधन दरवाढ कमी करू, असे आश्वासन ते देत हाेते. परंतु, सत्तेत आल्यानंतर त्यांना आपल्या आश्वासनांचा विसर पडल्याचा आराेप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. मागील काही महिन्यांपासून पेट्राेल, डिझेलचे दर झपाट्याने वाढत आहेत. घरगुती गॅसचे दरही आवाक्याबाहेर गेले आहेत. असे असतानाही केंद्रातील माेदी सरकार याबाबत काहीच उपाययाेजना करताना दिसत नाही. सरकारच्या अशा दुर्लक्षित धाेरणामुळे सर्वसामान्यांना जगणे कठीण झाले आहे. वाहनधारकही हैराण आहेत. सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्या मार्गदर्शनाखाली भूम शहरातील गाेलाई चाैकामध्ये पक्षाच्या वतीने निषेध नाेंदविण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जाेरदार घाेषणाबाजी केली. सरकारने तातडीने इंधन दरवाढ तसेच कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणीही करण्यात आली. आंदाेलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश शेंडगे, नगरसेवक रोहन जाधव, माजी नगरसेवक सोपान वरवडे, युवक जिल्हा सरचिटणीस गणेश शाळू, विलास शाळू, शिराज मोगल, राजू साठे, मोईज सय्यद आदी उपस्थित हाेते.