उस्मानाबाद : तापलेले उन्ह, उष्णतेने अंगाची झालेली लाही-लाही...पेरण्या खोळंबलेल्या, तर झालेल्या ठिकाणी पिके सुकण्याच्या बेतात आलेली... सगळीकडे वरुणदेवाचा धावा सुरू होता. ही स्थिती अवघ्या दोन-तीन दिवसांपूर्वींची. अन् आज नूरच पालटला. वरुणदेव इतका धावून आला, धो-धो बरसला की, त्याने होत्याचे नव्हतेच करून टाकले. शुक्रवार व शनिवारच्या रात्री जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. याचा सर्वाधिक फटका हा पाडोळी मंडळाला बसला आहे.
पावसाअभावी पिके सुकत चाललेल्या उस्मानाबादला शुक्रवारी व शनिवारच्या रात्री मात्र पावसाने चांगलेच झोडपले. जिल्ह्यात १४ मंडलांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे, तर परंडा शहर व परिसरात मुसळधार पाऊस झाला. उस्मानाबाद तालुक्यातही जोरदार पावसाची नोंद झाली. विशेषत: पाडोळी मंडलात १०० मिलिमीटरसह अतिवृष्टी नोंदली गेली आहे. या पावसामुळे पाडोळी परिसरातून वाहणाऱ्या नद्या, ओढे दुथडी भरून वाहत होते. दरम्यान, ओढ्याच्या पुरात उस्मानाबाद तालुक्यातील बोरगाव व समुद्रवाणी येथे दोन वेगवेगळ्या घटनांत दोघेजण वाहून गेले आहेत. त्यांचा आपत्ती व्यवस्थापनाकडून शोध घेतला जात आहे. शिवाय, पुराचे पाणी व शोधकार्य पाहण्यासाठी गेलेला एक गावकरीही पाण्यात वाहून गेला. त्याचे नेमके नाव-गाव समजलेले नाही. त्याचाही शोध बचाव पथकाकडून घेतला जात आहे. तर शुक्रवारी रात्री उशिरा समुद्रवाणी गावातील पुलावरून एक कार पाण्यात वाहून गेली. या कारमध्ये चौघेजण होते. दोघेजण पाण्याच्या अंदाज घेण्यासाठी खाली उतरले, तर दोघे कारमध्येच होते. कारमध्ये अडकलेल्या दोघांना गावकऱ्यांनी मानवी साखळी करून पाण्याबाहेर काढण्यात यश मिळविले. दरम्यान, या पावसामुळे पाडोळी मंडळातील शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. इतरही काही ठिकाणी बांध फुटले आहेत; तर अनेक ठिकाणी शेतीत पाणी साचले आहे. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
कोठे, किती झाला पाऊस...
परंडा मंडळात सर्वाधिक १२८ मि.मी. पाऊस झाला आहे, तर परंडा तालुक्यातील सोनारी १००, अनाळा ९२, आसू ७९, जवळा ७६, तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग ९२, जळकोट ७२, इटकळ ६९, सलगरा ६५, उमरगा मंडळात ९७, मुळज ८९, डाळिंब ७०, लोहारा तालुक्यातील माकणी ८८, लोहारा मंडळात ७१, तर उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी मंडळात १०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा परंडा तालुक्यात झाला आहे. मात्र, नुकसान परंड्यापेक्षा उस्मानाबाद तालुक्यात जास्त झाले आहे.