आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मामाच्या मुलाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:21+5:302021-07-08T04:22:21+5:30
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर येथील घाटात मंगळवारी एका तरुण ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी हा अपघात असावा, ...

आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी मामाच्या मुलाचा खून
तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर येथील घाटात मंगळवारी एका तरुण ट्रॅक्टर चालकाचा मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी हा अपघात असावा, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र, पोलीस तपासात हा प्रकार म्हणजे खून करून अपघाताचा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तातडीने तुळजापूर पोलिसांनी मयत तरुणाच्या आत्याच्या मुलाला आरोपी म्हणून गजाआड केले आहे.
लातूर जिल्ह्यातील उजनी येथील आकाश दगडू सोनटक्के (२८) हा ३ जुलै रोजी रात्री दुचाकीवरून घराबाहेर पडला होता. तेव्हापासून तो बेपत्ता असल्याने भादा पोलिसांत मिसिंग दाखल करण्यात आली होती. दरम्यान, तुळजापूरच्या घाटात मंगळवारी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. चौकशीत हा मृतदेह आकाशचा असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर सायंकाळी मयत आकाशच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेची माहिती घेत पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी पोलीस निरीक्षक अजिनाथ काशिद यांना तपासाबाबतच्या सूचना केल्या. यानंतर सहायक निरीक्षक सुशीलकुमार शिंदे, उपनिरीक्षक राहुल रोटे, कर्मचारी अजित सोनवणे, भोपळे, वानखेडे यांच्या पथकाने केळगाव (जि.लातूर) येथून आरोपी विवेकानंद ऊर्फ अनिल शिवराम काळे यास अटक केली आहे. त्यास बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, याप्रकरणातील आरोपीचा आणखी एक साथीदार फरार आहे. पोलीस आता त्याचा शोध घेत आहेत.
का व कसा केला आकाशचा खून...
आरोपी अनिल काळे याची आई व मयत आकाशच्या कुटुंबीयात शेतीवरून वाद सुरू होता. त्याच्या आजीच्या अंत्यविधीवेळी आकाशने आरोपी अनिलच्या आईला घराबाहेर काढले होते. त्याचा राग मनात धरून खून केल्याचे आरोपीने कबूल केले आहे.
आरोपीने मयत आकाशला फोन करून घरातून बाहेर बोलावून घेतले होते. तुळजापूर रस्त्याने चारचाकी वाहनातून त्याला नेत असताना भरमसाट मद्य पाजले. आकाश पूर्णत: मद्याच्या अमलाखाली गेल्याचे लक्षात आल्यानंतर तुळजापूरच्या घाटात आणून तेथे डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. नंतर अपघात भासावा यासाठी दुचाकीसह त्याला खाली फेकून दिले व घटनास्थळावरून पळ काढला.