पुतळा चबुतऱ्याची उंची वाढविण्याबाबत कळंबकर आग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:30 IST2021-02-07T04:30:16+5:302021-02-07T04:30:16+5:30

रस्ता कामामुळे पुतळा परिसर होतोय खुजा कळंब : छत्रपती शिवाजी महाराज चौक हे कळंब शहरातील एक प्रमुख स्थान, याच ...

Kalambakar insists on increasing the height of the statue platform | पुतळा चबुतऱ्याची उंची वाढविण्याबाबत कळंबकर आग्रही

पुतळा चबुतऱ्याची उंची वाढविण्याबाबत कळंबकर आग्रही

रस्ता कामामुळे पुतळा परिसर होतोय खुजा

कळंब : छत्रपती शिवाजी महाराज चौक हे कळंब शहरातील एक प्रमुख स्थान, याच ठिकाणाला स्पर्श करून एक राष्ट्रीय महामार्ग व एक राज्यमार्ग विकसित होत आहे. यातून जवळपास दोन फुट एवढी परिसरातील रस्त्याची उंची वाढत आहे. याचा विचार करता महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढवावी अशी आग्रही मागणी पुढे आली आहे.

शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा, ही कळंबकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी १९९९ साली वास्तवात आली. कळंब येथे छत्रपती शिवरायांच्या भव्य अशा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण झाले.

तत्कालीन काळात बांधकामाच्या वास्तुविशारदांचा आराखडा व कला संचनालयाने दिलेल्या मान्यतेनुसार ब्रांझचा पुतळा सिमेंटच्या चबुतऱ्यावर उभारण्यात आला. पुढे यास साधारणतः आठ मीटर रूंदीचे ‘सर्कल’ करून सुशोभीकरण करण्यात आले. यातच विदर्भ टु पश्चिम महाराष्ट्र व्हाया मराठवाडा असा मार्गक्रमण करणारा खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग या चौकाला स्पर्श करत तर गेलाच; शिवाय तो सध्या विकसित होत आहे. तसेच कळंब-ढोकी या हायब्रिड अन्युईटी अंतर्गत करण्यात येणाऱ्या रस्ता कामाचा आरंभ बिंदूही याच चौकात आहे.

एकाचवेळी या चौकात येणारे परळी, बार्शी व ढोकी या तीन रस्त्याचे खोदकाम, भराई, दबाई व सिमेंट कॉंक्रिटीकरण असे काम होत असल्याने रस्त्याची उंची दोन फुटांपेक्षा जास्त वाढत आहे. केवळ ढोकी रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच वाढलेली उंची सहज जाणवत आहे.

यामुळे दोन्ही रस्ता काम पूर्णत्वास आल्यावर रस्त्याची उंची वाढल्याने पुतळा परिसर खुजा दिसण्याची शक्यता आहे. यातूनच शहराचे वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढवावी, त्यास सुशोभीकरण करावे अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

याविषयी सोमवारी होणाऱ्या नगरपरिषदेच्या विशेष सभेच्या अजेंड्यावरही हा विषय राहणार असल्याचे समजते. यामुळे याठिकाणी सकारात्मक चर्चा व निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

चौकट...

नगरपरिषदेकडे केली मागणी

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा चबुतऱ्याची उंची वाढवावी, अशी मागणी नुकतीच सकल कळंबकरांनी पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. यात अतुल गायकवाड, अमर चाऊस, संदीप बावीकर, डी. एस. पवार, दत्ता कवडे, श्रीकांत शेगदार, अजय पारवे, बजरंग ताटे, आबासाहेब फरताडे, मकरंद पाटील, शिवाजी गिड्डे, कृष्णा चव्हाण, प्रशांत गायकवाड, अक्षय मुळीक, इम्रान मिर्झा, अविनाश भोसले, विलास गुंठाळ, दत्ता पवार, सुहास इंगळे, संदीप शेंडगे, शशिकांत पाटील, राहुल चोंदे, संदीप शिंदे, राहुल खैरमोडे, विनोद पवार, अमित इटकर, सूरज कवडे, आबताब तांबोळी यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले आहे. यात विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह संभाजी ब्रिगेड,स्वराज्य रक्षक संभाजी महाराज प्रतिष्ठान, शिवाई प्रतिष्ठान, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, अ. भा. समता परिषद, अ. भा. शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, मराठा सेवा संघ, छावा व व्यापारी संघ अशा विविध संघटनांचा या मागणीत सहभाग आहे.

प्रतिक्रिया

रस्ते विकासानंतर रहदारी, वाहनाची वर्दळ वाढणार आहे. यास्थितीत पुतळ्याची उंची मात्र कमी होणार आहे. यामुळे वाहनांकडून धोका संभावतो. याचा गांभीर्याने विचार करून उंची वाढवण्यासंदर्भात योग्य तो निर्णय अपेक्षित आहे.

- अक्षय मुळीक, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद

पुतळा चबुतरा उंची वाढवण्याचे काम आणि सुशोभीकरण व्हावयास पाहिजे. तुळजापूर, औरंगाबाद येथे असे काम करण्यात आले आहे. कळंब येथेही याचा विचार करावा. तुळजापूरच्या धर्तीवर कळंब पालिकेनेही तसा ठराव घ्यावा अशी आम्ही सर्व शिवभक्तांनी मागणी केली आहे.

- अमर चाऊस, शिवप्रेमी, कळंब

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची वाढवणे गरजेचं आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवप्रेमींनी नगरपरिषदेकडे केली आहे. यानुसार निर्णय अपेक्षित आहे. आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये.

- गजानन फाटक, शिवप्रेमी, कळंब

औरंगाबाद, तुळजापूर येथील पुतळ्याची उंची वाढवण्यात आली आहे. त्याच धर्तीवर कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची उंची वाढविण्यात यावी, ही प्रत्येक मावळ्यांची इच्छा आहे. याची दखल प्रशासन नक्कीच घेईल अशी आशा आहे.

- हर्षद अंबुरे, व्यापारी संघटना, कळंब

Web Title: Kalambakar insists on increasing the height of the statue platform