‘कष्ट करून पोट भरतो, तरीही जगणं कठीण झालंय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:29 IST2021-04-12T04:29:56+5:302021-04-12T04:29:56+5:30

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील सहा शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात फुलशेती केली. परंतु, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाने लॉकडाऊन लावल्यामुळे व ...

‘Hard work fills the stomach, yet life is hard’ | ‘कष्ट करून पोट भरतो, तरीही जगणं कठीण झालंय’

‘कष्ट करून पोट भरतो, तरीही जगणं कठीण झालंय’

अणदूर : तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील सहा शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात फुलशेती केली. परंतु, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाने लॉकडाऊन लावल्यामुळे व मार्केट बंद झाल्यामुळे सर्व फुले शेतातच वाळून जात असल्याने ‘कष्ट करून पोट भरतो, तरीही जगणं कठीण झालंय’, अशी निराशाजनक प्रतिक्रिया हे शेतकरी व्यक्त करीत आहेत.

केशेगाव येथील गुलाब नदाफ, शेकुंबर नदाफ, बाबुलाल नदाफ, हैदर नदाफ, अफसर नदाफ व वजीर नदाफ हे शेतकरी गेल्या दहा वर्षांपासून आपल्या शेतात फुलशेती करतात. यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. या सर्वांनी प्रत्येकी एकेक एकरामध्ये ‘पांढरी बिजली’ या जातीच्या फुलाची लागवड केली आहे. परंतु, मागील वर्षापासून त्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या या महामारीत गतवर्षी त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. परंतु, शासनाकडून कसलीही मदत मिळाली नाही. मध्यंतरी थोडा काळ कोरोना ओसरला असल्यामुळे परत त्यांनी फुलशेतीची लागवड केली. यासाठी सावकाराकडून कर्ज काढले. परंतु, गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा मार्केट बंद झाल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. फुलशेती हे तीन महिन्याचे पीक असून, यातच त्यांच्या वर्षाची कमाई निघत होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लाॅकडाऊन लावल्यामुळे कोणताही व्यापारी फुले घेत नाही. व्यापाऱ्याकडे बळजबरीने फुले घेऊन गेले तर प्रवास खर्चही पदरात पडत नाही. याचा जनावरांना चाराही होत नाही. त्यामुळे फुले रानातच वाळून जात आहेत. यात प्रत्येकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी गुलाब नदाफ व शेख शेकुंबर नदाफ यांनी सांगितले. शासनाने आमच्या शेतीचे त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Web Title: ‘Hard work fills the stomach, yet life is hard’