हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST2021-07-16T04:23:23+5:302021-07-16T04:23:23+5:30

उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हॉटेल मागील दोन महिने बंद होते. आता हॉटेल उघडले आहेत. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात पदार्थ ...

Don't pamper your tongue as the hotel has opened, it's raining, take care of your stomach! | हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा !

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा !

उस्मानाबाद : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे हॉटेल मागील दोन महिने बंद होते. आता हॉटेल उघडले आहेत. मात्र, पावसाळ्याच्या दिवसात पदार्थ पचत नसल्याने अनेकांना पोटाचे त्रास उद्भवू लागतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात चटपटीत पदार्थ खाऊन जिभेचे लाड पुरविताना अनेकांची पंचाईत होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने पौष्टिक व सकस आहाराचे सेवन करून पोट सांभाळावे, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट धडकल्याने मागील दोन महिने हॉटेल बंद होते. त्यामुळे अनेक खवय्यांना बाहेर पदार्थांचा आस्वाद घेता येत नव्हता. मागील काही दिवसांपासून हॉटेल उघडले आहेत. मात्र, पावसाळा सुरू झाल्याने अनेकांना बाहेर खाणे अवघड झाले आहे. बाहेरील चटपटीत, तळलेले व जड अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर पोटाच्या समस्या उद्भवू लागत आहेत. अनेकांना जुलाब, उलटी तसेच पोटदुखीचा त्रास होत असतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात बाहेरील अन्नपदार्थ खाण्याऐवजी घरातील सकस आहार घ्यावा, असे आहारतज्ज्ञांनी सांगितले.

पावसाळ्यात हे खायला हवे

पावसाळ्याच्या दिवसात पाणी स्वच्छ गाळून उकळून पिणे.

बाजारपेठेत ऋतूत उपलब्ध असलेले फळे नियमित खाणे.

या दिवसात नियमित गरम पेय व भाज्यांचे सूप पिण्यावर भर द्यावा.

संध्याकाळच्या जेवणात हलका आहाराचा समावेश करावा.

नियमित जेवणात कडधान्य तृणधान्याचा वापर करणे आवश्यक आहे.

पावसाळ्यात हे खाणे टाळावे.

पावसाळ्यात पचनास कठीण असलेले जड, तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

हॉटेल तसेच इतर ठिकाणचे अस्वच्छ पाणी पिणे टाळावे.

हवा बंद डब्यातील पदार्थ आरोग्यास हानिकारक असल्याने ते पावसाळ्यात अजिबात खाऊ नयेत.

हातगाड्यांवर उघडे असलेले अन्नपदार्थ खाणे टाळावे.

बाजारातून आणलेल्या भाज्या, फळे न धुता खाणे टाळावे.

रस्त्यावरचे अन्न नकोच

पावसाळ्याच्या दिवसात माशा तसेच डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले असते. घाणीवरील माशा उघड्यावरील अन्न पदार्थांवर बसल्याने पोटाचा त्रास उद्भवू शकतो. तसेच जुलाब, उलटीची समस्या जाणवू लागते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात रस्त्याच्या दुतर्फा उघडे असलेले अन्न पदार्थ खाणे टाळणेच आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. तसेच बाहेरील अस्वच्छ पाणी पिणेही पोटाच्या आजाराला आमंत्रण देऊ शकते.

आजारतज्ज्ञ काय म्हणतात...

पावसाळ्यात जलजन्य आजाराचा अधिक धोका असतो. त्यामुळे स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे. त्याचबराेबर बाजारातून आणलेल्या भाज्या तसेच फळे पाण्यात मीठ टाकून धुवून घेतल्यानंतर खाव्यात. उघड्यावरील अन्न पदार्थ, तळलेले व जड पदार्थ खाणे टाळणे आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

कल्पना दौंडे, आहारतज्ज्ञ

पोटाचे आजार टाळण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात बाहेरचे व उघड्यावरील अन्न पदार्थ खाणे टाळलेच पाहिजेत. शिवाय, जेवणात हलके भाजलेले व उकडलेल्या पदार्थांचा समावेश करावा. सकाळ-संध्याकाळ कोमट पाणी पिणे, चहामध्ये सुंठ, अद्रक टाकून पिणे, झोपतेवेळी हळद टाकलेले कोमट दूध पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.

प्रीती रुपनर, आहारतज्ज्ञ

Web Title: Don't pamper your tongue as the hotel has opened, it's raining, take care of your stomach!