पीक विम्याबाबत निरुत्साह?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:19+5:302021-07-08T04:22:19+5:30
भूम : खरीप हंगामातील पीक विमा हप्ता भरण्यासाठी आता शेवटचे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत; परंतु गतवर्षीच्या खरीप ...

पीक विम्याबाबत निरुत्साह?
भूम : खरीप हंगामातील पीक विमा हप्ता भरण्यासाठी आता शेवटचे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत; परंतु गतवर्षीच्या खरीप हंगामात भरलेला पीक विमा मंजूर न झाल्याने यंदाच्या हंगामात खरीप पिके विमा संरक्षित करण्याबाबत शेतकरी उदासीन असल्याचे सध्याच्या स्थितीवरून दिसून येत आहे.
गतवर्षी पीक विमा भरण्यासाठी भूम तालुक्यात ईट, भूम, माणकेश्वर, वालवड आणि अंबी या पाचही महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. या हंगामात तब्बल दीड लाख शेतकऱ्यांनी जवळपास पावणेचार कोटींपेक्षा अधिक विमा हप्ता जमा करून पिके संरक्षित करून घेतली होती. हा पीक विमा मंजूर होऊन रक्कम हाती पडल्याने अनेक देणी देता येतील, शिवाय पुढील हंगामात मदत होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु, पावसाने मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान होऊन देखील सरकारने विमाच मंजूर केला नसल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला. यंदाही तालुक्यात तब्बल १०३ टक्के खरिपाचा पेरा झाला आहे. यात सोयाबीन, उडीद, तूर, मूग या पिकांचे क्षेत्रही समाधानकारक आहे; परंतु सध्या पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी देखील केली. पावसाचा खंड पडल्याने ही पिके धोक्यात येऊ शकतात, अशी स्थिती सध्या आहे. त्यामुळे पिके विमा संरक्षित करून घेणे गरजेचे आहे. परंतु, मागील वर्षीचाच पीक विमा मिळाला नसल्याने यंदा पिके संरक्षित करावीत की नाही, अशा संभ्रमावस्थेत शेतकरी दिसून येत आहेत. यंदाचा विमा भरण्यासाठीची अंतिम तारीख १५ जुलै असून, आता शेवटचे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. असे असतानाही अद्याप विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांचा फारसा उत्साह दिसून येत नाही.