सव्वाशेवर प्रकरणांचा झाला गावातच निपटारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST2021-07-09T04:21:37+5:302021-07-09T04:21:37+5:30
अणदूर : महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून मागील दीड वर्षाच्या कालावधीत गावातील कौटुंबिक हिंसाचार, शेतीचे बांध, फौजदारी यासारखी सव्वाशेवर ...

सव्वाशेवर प्रकरणांचा झाला गावातच निपटारा
अणदूर : महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या माध्यमातून मागील दीड वर्षाच्या कालावधीत गावातील कौटुंबिक हिंसाचार, शेतीचे बांध, फौजदारी यासारखी सव्वाशेवर प्रकरणे गावातच मिटविण्यात तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील समितीला यश आल्याने समिती स्थापण्याचा उद्देश साध्य होत असल्याचे दिसून येत आहे.
गाव पातळीवर शांतता नांदावी, गावांमध्ये निर्माण होणाऱ्या लहान तंट्यांचे रूपांतर मोठ्या तंट्यांमध्ये होऊ नये, लोकांचा वेळ-पैसा वाया जाऊ नये, कुटुंबाबरोबर समाज व गावची शांतता धोक्यात येऊ नये, गावागावात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्या कार्यरत आहेत. परंतु, बहुतांश गावातील या समित्यांचे कार्य कागदोपत्री दिसून येते. अनेक ठिकाणी या समितीचे अध्यक्षपद प्रतिष्ठेचे समजून याच्या निवडीवेळीच वाद झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. शिवाय, प्रशासनाचे देखील या समित्यांकडे फारसे लक्ष नसल्याचे जाणवते.
असे असले तरी तुळजापूर तालुक्यातील केशेगाव येथील समितीने मात्र ही समिती स्थापन करण्यामागचा उद्देश प्रत्यक्षात अमलात आणल्याचे दिसत आहे. गेल्या दीड वर्षात या समितीच्या माध्यमातून महिलांच्या संदर्भात कौटुंबिक हिंसाचाराची तीस प्रकरणे, महसूल प्रकरणांमधील शेतीचे व शेतबांधाचे ६०, फौजदारी ४० प्रकरणे गावातच सामंजस्यातून मिटविली. याशिवाय, न्यायालयातील दोन प्रकरणे मिटविण्यात देखील या समितीच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे.
बायपास रस्ताही वाहतुकीसाठी खुला
या समितीने चाळीस वर्षांपासूनची शेतीची अनेक प्रकरणे मिटविली. शंभर वर्षांपासून चालू असलेला शेत रस्त्याचा वाद मिटविण्यात देखील समिती पदाधिकाऱ्यांना यश आले. याशिवाय, भीमनगर ते मठ हा बायपास अनेक वर्षांपासून बंद होता. समिती पदाधिकाऱ्यांनी लोकांचे मतपरिवर्तन करून रस्त्यात येणारी घरे, उकिरडे दूर करत हा प्रश्न देखील मार्गी लावला. त्यामुळे हा बायपास देखील वाहतुकीसाठी खुला झाला आहे. प्रेम प्रकरणाचे रूपांतर विवाहामध्ये करून काहींचे संसार फुलविण्याचे काम देखील या समितीच्या माध्यमातून झाले आहे.
यांचा आहे पुढाकार
गावातील सर्वधर्मसमभाव, धार्मिक सलोखा, जातीय सलोखा, महिला सक्षमीकरण, आंतरजातीय विवाहाला प्राधान्य, वृक्षारोपण हे उपक्रम देखील समितीच्या माध्यमातून सध्या सुरू आहेत. यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रदीप हुकिरे, उपाध्यक्ष सिद्धू दहिटणे, पोलीस पाटील स्वामी, चन्नाप्पा साखरे, भीमाशंकर घंटे, गणेश कांबळे, बापूराव धबाडे, शिवराज साखरे, मल्लय्या स्वामी, मारुती पवार, रतन पवार, लक्ष्मण हन्नुरे, पांडुरंग साखरे, लक्ष्मण क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला आहे.