कोरोना चाचण्यांसाठी स्वतंत्र पथके नियुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST2021-06-19T04:22:24+5:302021-06-19T04:22:24+5:30

लोहारा : तालुक्यातील धानुरी गावात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यासाठी चार स्वतंत्र ...

Assign separate squads for corona tests | कोरोना चाचण्यांसाठी स्वतंत्र पथके नियुक्त करा

कोरोना चाचण्यांसाठी स्वतंत्र पथके नियुक्त करा

लोहारा : तालुक्यातील धानुरी गावात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यासाठी चार स्वतंत्र पथके स्थापन करून वॉर्डनिहाय नियोजन करा, अशा सूचना आ. ज्ञानराज चौगुले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

धानुरी येथे मागील महिनाभरापासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आ. ज्ञानराज चौगुले यांनी गुरुवारी तेथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी किरण गायकवाड, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संतोष रूईकर, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, बाबूराव शहापुरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण, ॲड. दीपक जवळगे, प्रा. आनंदराव सूर्यवंशी, सरपंच प्रवीण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटुकणे, ग्रामसेवक जाधव, परमेश्वर साळुंके, संदीप बनकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी गावात जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करण्यासाठी आरोग्य विभागाचे ४ स्वतंत्र पथके स्थापन करावीत, नागरिकांनी घाबरून न जाता सतत मास्क लावावा, हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, विशेषतः लहान बालकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीमुळे येत्या दोन दिवसांत धानुरी गावात ३० बेडचे विलगीकरण कक्ष सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. यावेळी धानुरी गावातील अवैध धंदे वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने यावर कठोर कारवाईचे निर्देशही त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले.

Web Title: Assign separate squads for corona tests