शिपायाच्या भरवशावर चालतेय पशुंची आरोग्यसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST2021-07-08T04:22:23+5:302021-07-08T04:22:23+5:30

आंबी : भूम तालुक्यातील आंबी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे प्रमुख पद मागील चार वर्षांपासून रिक्त आहे. यामुळे या रुग्णालयाचा ...

Animal health services run on the confidence of the soldiers | शिपायाच्या भरवशावर चालतेय पशुंची आरोग्यसेवा

शिपायाच्या भरवशावर चालतेय पशुंची आरोग्यसेवा

आंबी : भूम तालुक्यातील आंबी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील डॉक्टरांचे प्रमुख पद मागील चार वर्षांपासून रिक्त आहे. यामुळे या रुग्णालयाचा सगळा भार केवळ एका शिपायाच्या खांद्यावर असल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाल्याचे दिसत आहे.

आंबी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत आंबीसह आनंदवाडी, बिरोबाचीवाडी, जयवंतनगर, बेदरवाडी, दाडेगाव, तिंत्रज, नळी वडगाव आदी गावे येतात. या भागातील शेतकरी शेतीला पूरक म्हणून मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय करतात. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. त्यामुळे या प्रत्येक गावात पशुधनाची संख्याही मोठी आहे. या गावातील पशुधनांची आरोग्य तपासणी करण्यासोबतच लसीकरण मोहीम, पशुपालकांना मार्गदर्शन यासारखे उपक्रम आंबी येथील रुग्णालयामार्फत राबविले जातात.

दरम्यान, आंबी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मागील काही महिन्यांपासून डॉक्टरांसोबतच परिचारक, ड्रेसर ही पदे रिक्त आहेत. त्यामुळे सध्या केवळ एका शिपायाच्या खांद्यावर या रुग्णालयाची मदार आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी येथे सेवेत असलेल्या शिपायाच्या वडिलाचे निधन झाले. त्यामुळे सध्या हा दवाखाना कुलूपबंद आहे. सद्य:स्थितीत दवाखान्यात अनेक गैरसोई असून, त्यातच भर म्हणून काही दिवसांपूर्वी येथे जनावरांच्या तपासणीसाठी असलेला लोखंडी सापळादेखील गायब झाला आहे. याबाबत येथील सेवक आर. बी. आठवले यांना विचारले असता गुत्तेदाराने तो काढून नेला असल्याचे सांगितले. एकूणच रुग्णालयाच्या या अवस्थेमुळे सध्या पशुधनाच्या आरोग्य सेवेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन रिक्त पदे भरावीत, अशी मागणी होत आहे.

कोट......

आंबी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाचा पदभार सध्या माझ्याकडेच आहे. ज्या-ज्या वेळी आवश्यकता वाटेत त्या-त्या वेळी मी आंबीला हजर होतो. येथील लोखंडी सापळा गुत्तेदाराने काढून नेऊन तो नवीन इमारतीत बसविला आहे. याबाबत आपण वरिष्ठांना देखील कल्पना दिली आहे.

- डॉ. दत्तात्रय इंगोले, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी, भूम

Web Title: Animal health services run on the confidence of the soldiers