एजन्सी बदलली तरी हाल कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST2021-07-16T04:23:19+5:302021-07-16T04:23:19+5:30

कळंब : लातूर कळंब रस्त्यासाठी दुसरी ‘एजन्सी’ आली, परंतु ‘यंत्रणा’ अद्याप पोहोचली नसल्याने खोदून ठेवलेल्या रस्त्यावर दलदल निर्माण असून, ...

Although the agency has changed, the situation remains the same | एजन्सी बदलली तरी हाल कायम

एजन्सी बदलली तरी हाल कायम

कळंब : लातूर कळंब रस्त्यासाठी दुसरी ‘एजन्सी’ आली, परंतु ‘यंत्रणा’ अद्याप पोहोचली नसल्याने खोदून ठेवलेल्या रस्त्यावर दलदल निर्माण असून, ती लोकांच्या जीवावर उठली आहे. या चिखलमय घसरगुंडीचा ‘प्रसाद’ मिळालेल्या नागरिकांकडून ही बेबंदशाही कुठवर सहन करायची, असा संतापजनक सवाल उपस्थित केला जात आहे.

लातूर-कळंब या राज्यमार्गाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘हायब्रिड ॲन्युईटी’अंतर्गत सुधारणा होत आहे. यासाठी दोन्ही तालुक्यातील ६० किमी विकासाचा १८८ कोटी रुपयांचा ठेका औरंगाबादस्थित एका कंपनीला देण्यात आला. यानंतर डिकसळ ते राजणी तालुका हद्द या ३० किमी कामास जोरात सुरुवात झाली. मात्र, रखडपट्टीमुळे दोन वर्षात हे काम पूर्ण झाले नाही. यामुळे होत असलेला हा ‘विकास’ बांधकाम खाते, संबंधित ठेकेदार व त्रयस्थ एजन्सीच्या बेफिकिरीमुळे लोकांच्या जीवावर उठला आहे.

डिकसळ ते लोहटा पूर्व हा दहा किलोमीटर लांबीचा भाग खोदून सोडला आहे. यानंतर कोथळा पाटी ते ताडगाव पक्का रस्ता तयार असला तरी ताडगाव ते लोमटे वस्ती पुन्हा अर्धवट काम आहे. एकूणच काम करणारी यंत्रणाच दिसून येत नाही. यामुळे अर्धवट रस्त्यावर दलदल निर्माण होऊन वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.

चौकट...

अद्याप यंत्रणा गायबच...

एजन्सी अन् तिच्या पोट गुत्तेदाराची यंत्रणा रस्ता काम अर्धवट ठेवून गायब झाली होती. यानंतर मुख्य एजन्सीने आपली ‘जॉइंट व्हेंचर’ कंपनी बदलली होती. यासंबंधी ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले होते. आता नवी एजन्सी नेमून अनेक दिवस उलटले असले तरी प्रत्यक्षात कामाने गती घेतली नाही. यामुळे परत एकदा भरपावसात रस्त्याचे भिजत घोंगडे पडले आहे.

लोक पडताहेत, जखमी होताहेत...

दरम्यान, चिखलमय रस्त्यावर प्रवास करताना अनेक जण घसरून पडल्याने जखमी होत आहेत. तरी लोकप्रतिनिधी, केवळ सोशल मीडियावर वावर असलेले पुढारी गप्प आहेत. यामुळे सामान्यजन कुठवर ही बेफिकिरी सहन करायची? असे म्हणत संताप व्यक्त करत आहेत. ताडगाव ते लोमटे वस्ती या अंतरावर रस्त्याचे रूपांतर दलदलीत झाले आहे. या गाळातून सुखरूप बाहेर आलो तर ‘पोहोचलो’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. डिकसळ ते कोथळा पाटीची स्थिती काही वेगळी नाही. ही अनुभूती म्हणजे खूपच जीवघेणी अन् चित्तथरारक अशी आहे.

Web Title: Although the agency has changed, the situation remains the same