जप्त केले १३ हजार, दाखविले ४ हजारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:01 IST2021-02-06T05:01:05+5:302021-02-06T05:01:05+5:30
उस्मानाबाद : पोलीस आणि आरोपींतील हमरीतुमरी ही सहसा जगजाहीर होत नाही. फार तर ती न्यायालयासमोरच उघड होत असते. मात्र, ...

जप्त केले १३ हजार, दाखविले ४ हजारच
उस्मानाबाद : पोलीस आणि आरोपींतील हमरीतुमरी ही सहसा जगजाहीर होत नाही. फार तर ती न्यायालयासमोरच उघड होत असते. मात्र, तेर येथील काही जुगार प्रकरणातील आरोपींनी थेट पोलिसांवरच जप्त रक्कम ढापल्याचा आरोप करीत पोलीस अधीक्षकांकडे धाव घेतल्याने प्रकरणाची जाहीर वाच्यता झाली.
पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करीत आरोपींनी पोलिसांची चौकशी मागण्याची केली आहे. त्यांच्या दाव्यानुसार तक्रारदार चार आरोपी हे तेर येथील पेठ भागातील झाडाखाली ३१ जानेवारी रोजी दुपारी तिर्रट नावाचा जुगार खेळत बसले होते. यावेळी तेर आऊटपोस्टच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी तेथे धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी आमच्या खिशातील १३ हजार २९० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले होते. शिवाय, गुन्हा दाखल न करण्यासाठी १० हजार रुपये घेतल्याचा दावा तक्रारदार आरोपींनी केला आहे. मात्र, इतके होऊनही त्या पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केलाच, मात्र जप्त केलेली रक्कम १३ हजार २९० रुपये असताना रेकॉर्डला केवळ ४ हजार २९० रुपये जप्त केल्याचे दाखविले आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषी आढळल्यास त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी या आरोपींनी केली आहे.
आरोप खोटा...
संबंधित तक्रारदारांच्या आरोपात कसलेही तथ्य नाही. यातील एक तक्रारदार वडिलांना सोडविण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकू पाहात होता. तो झुगारून लावल्याने तो खोट्या तक्रारी करीत फिरत आहे.
- सहायक पोलीस निरीक्षक, ढोकी