चमकेच्या औषधावरून बेवारस मृतदेहाचा उलगडा; नवी मुंबई, मुंबई, पुण्यातील मजूर वस्त्यांची झाडाझडती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:33 IST2026-04-30T12:32:40+5:302026-04-30T12:33:47+5:30
सीबीडी येथील पुलाखाली १७ एप्रिलला एका मजुराचा मृतदेह आढळला होता. दगडाने डोके ठेचून त्याची हत्या झाली होती. मात्र, मृताचे नाव व मारेकरी निष्पन्न झाले नव्हते.

चमकेच्या औषधावरून बेवारस मृतदेहाचा उलगडा; नवी मुंबई, मुंबई, पुण्यातील मजूर वस्त्यांची झाडाझडती
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - चमकेवरच्या औषधावरून हत्येचा गुन्हा उघड करून नवी मुंबई पोलिसांनी कौशल्य पुन्हा एकदा दाखवून दिले. सीबीडी येथील पुलाखाली एका बेवारस व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा उघड करण्यासाठी पोलिसांना नवी मुंबई, मुंबई, पुण्यातील बेघर मजुरांच्या वस्त्यांची झाडाझडती घेतली. त्यातून हाती लागलेल्या सुभाष धुर्वे (२७) व अरविंद सकपाळ (३५) यांनी रोजच्या भांडणात दारूच्या नशेत मित्र आकाश राठोड (३१) याला संपविल्याची कबुली दिली.
कोणताही गंभीर गुन्हा घडला की पोलिसांपुढे तपासाचे आव्हान उभे राहत असते. घटनास्थळावरील पुरावे गोळा करून त्यातून गुन्हेगारापर्यंतचा मार्ग शोधावा लागतो. त्यासाठी तपास पथकाला घटनास्थळावर जे मिळेल त्याकडे पुरावा म्हणूनच बघावे लागते. याच कौशल्याने सीबीडी येथील बेवारस व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आला आहे. सीबीडी येथील पुलाखाली १७ एप्रिलला एका मजुराचा मृतदेह आढळला होता. दगडाने डोके ठेचून त्याची हत्या झाली होती. मात्र, मृताचे नाव व मारेकरी निष्पन्न झाले नव्हते.
तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाला दिशा
गुन्ह्याच्या तपासासाठी सहायक पोलिस आयुक्त मयूर भुजबळ यांनी सीबीडी, एनआरआय व नेरूळ पोलिस ठाण्यांची तीन पथके नेमली. तपासाला दिशा मिळत नसतानाच घटनास्थळी मिळालेले चमकेवरचे औषध नेमके कुठून घेतले असावे, हे पोलिसांनी तपासले असता औषधाच्या दुकानाचे सीसीटीव्हीतील फोटो हाती लागला. त्या आधारे मुंबईच्या काॅटन ग्रीन परिसरात १०० ते १५० मजुरांच्या झाडाझडतीत एक जण हाती लागला. त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदाराचेही नाव सांगितले.
पोलिसांची २ दिवस पाळत
तपासादरम्यान, पोलिसांनी गुन्ह्याची कल्पना देऊन त्याने संपर्क साधल्यास कळविण्यास सांगितले. त्याने पुण्यातून घरी फोन केला असता कुटुंबियांनी पोलिसांना त्याची माहिती दिली. यावरून पथकाने पुण्याच्या गुलटेकडी परिसरात दोन दिवस पाळत ठेवून त्यालाही अटक केली. बेलापूर येथील पुलाखाली किंवा जागा मिळेल तिथे रात्र काढून दिवसा मिळेल ते काम ते करायचे.