मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात वानखेडे स्टेडियमवर काल खेळला गेलेला सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात धावांचा पाऊस पाहायला मिळाला असून दोन्ही संघांनी मिळून एकूण ५०२ धावा केल्या. हैदराबादच्या संघाने २४३ धावांचे लक्ष्य सहज गाठून हा सामना जिंकला. मात्र, हैदराबादच्या विजयापेक्षा त्यांचा युवा फलंदाज सलिल आरोरा याच्या धडाकेबाज खेळीची चर्चा रंगली आहे.त्याने जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहला मारलेल्या 'नो-लुक सिक्स'ने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मुंबईच्या संघाने दिलेल्या २४३ धावांचा पाठलाग करताना हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेनरिक क्लासेन यांनी दमदार फलंदाजी केली, पण फिनिशर म्हणून आलेल्या २३ वर्षीय सलिल अरोराने सामन्याचा नूर पालटला. हा सामना हैदराबादच्या संघाने १८.३ षटकांत ६ विकेट्स राखून पूर्ण केले.
हैदराबादला शेवटच्या काही षटकांत विजयासाठी वेगाने धावांची गरज होती. समोर जसप्रीत बुमराहसारखा अनुभवी गोलंदाज असताना सलिल अरोराने कमालीचा आत्मविश्वास दाखवला. बुमराहच्या पाचव्या चेंडूवर सलिलने'नो-लुक सिक्स' लगावला. या शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. बुमराहसारख्या दिग्गज गोलंदाजाची होत असलेली धुलाई पाहून बाउंड्री लाईनवर उभा असलेला माजी कर्णधार रोहित शर्माही शॉक झाला. सलिल अरोराने ३०० च्या स्ट्राईक रेटने फक्त १० चेंडूत नाबाद ३० धावा केल्या. यात दोन चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांचा समावेश आहे.
या विजयासह सनरायझर्स हैदराबादने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली असून, सलिल अरोराच्या रूपाने आयपीएलला एक नवीन फिनिशर मिळाल्याचे बोलले जात आहे. मुंबईला हरवून हैदराबादचा संघाचे १२ गुण झाले आहेत. गुणतालिकेत हैदराबादचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.