"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 15:49 IST2026-04-30T15:45:25+5:302026-04-30T15:49:47+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेळीमुळे उद्धव ठाकरेंनी माघार घेतल्याची टीका खासदार ज्योती वाघमारे यांनी केली.

"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
MP Jyoti Waghmare on Uddhav Thackeray: विधानपरिषद निवडणुकीच्या आखाड्यात उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीत धुसफूस सुरु असल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेना ठाकरे गटाने अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर करताच काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून, महायुतीने या संधीचा फायदा घेत ठाकरेंवर पराभवाच्या भीतीने निवडणूक लढवत नसल्याची टीका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खेळीमुळे उद्धव ठाकरेंनी माघार घेतल्याची टीका खासदार ज्योती वाघमारे यांनी केली.
काही दिवसांपूर्वीपर्यंत खुद्द उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, ऐनवेळी आदित्य ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यावरून शिंदे गटाच्या खासदार ज्योती वाघमारे यांनी बोचरी टीका केली. "आघाडीची बिघाडी तर कधीच झाली. त्यांच्यात कुठे एकमत होतं?" असा सवाल वाघमारेंनी केला आहे. "दानवेंच्या उमेदवारीवरून त्यांच्यातला विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. एकनाथ शिंदे यांनी अधिकचा उमेदवार देण्याची हूल दिली. त्यातच उबाठाची बत्तीगुल झाली", असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी निवडणुकीतून माघार घेण्यामागे पराभवाची भीती होती का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
वाघमारे यांनी केवळ ठाकरेंनाच नव्हे, तर शरद पवारांनाही लक्ष्य केले. "शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंना प्रत्येकाकडे जाऊन विनंती करावी लागली. मविआचे भविष्य आता केवळ कागदावरच उरले आहे," असे विधान त्यांनी केले.
उद्धव ठाकरेंना उमेदवारी दिली तरच पाठिंबा देऊ, ही काँग्रेसची भूमिका आधीपासूनच स्पष्ट होती. मात्र, विश्वासात न घेता दानवेंची उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसने नाराजी व्यक्त केली. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता काँग्रेस आपला स्वतंत्र उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले. तर विजय वडेट्टीवार यांनीही या पद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली. मात्र महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेसने उमेदवार न देण्याची घोषणा केली.