आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 06:03 IST2026-04-28T06:03:12+5:302026-04-28T06:03:51+5:30
शुक्ला यांचे सात वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे, ही बाब त्यांनी लपवून ठेवल्याचेही महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले.

आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
मुंबई - लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार केल्याच्या आरोपांवरून महापालिकेच्या ‘के-पूर्व’ विभागाचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना पार्कसाईट पोलिसांनी सोमवारी अटक केली. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यावर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला एका खासगी कंपनीत आर्किटेक्ट इंजिनिअर आहे. तीन वर्षांपूर्वी नितीन शुक्ला हे विक्रोळी विभागात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत असताना कामानिमित्त त्यांची महिलेची भेट झाली होती. त्यांच्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर शुक्ला यांनी लग्नाचे आश्वासन देत अत्याचार केले.
तसेच, शुक्ला यांचे सात वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे, ही बाब त्यांनी लपवून ठेवल्याचेही महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले. शुक्ला आपली फसवणूक करत असल्याचे लक्षात येताच तिने २६ एप्रिलच्या रात्री पार्कसाईट पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत सोमवारी शुक्ला यांना अटक केली आहे. त्यांच्या अटकेला वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दुजोरा दिला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले.