Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 12:24 IST2025-10-24T12:23:08+5:302025-10-24T12:24:53+5:30
Satara Crime news: मोठी खळबळ उडाली असून मुळची जळगावची असलेल्या या महिला डॉक्टरने हे पाऊल उचलल्यान्यामागे नेमके कारण काय होते, असा सवाल आता पोलीस यंत्रणेसमोर आहे.

Phaltan Crime: महिला डॉक्टर हॉटेलमध्ये काय करत होती? आयुष्य संपविण्यापूर्वी ती तिथे कशी पोहोचली?
Phaltan Doctor Death: दिवाळीच्या काळात साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या महिला डॉक्टरने पोलीस अधिकाऱ्याने बलात्कार केल्याचे आरोप करत आत्महत्या केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून मुळची जळगावची असलेल्या या महिला डॉक्टरने हे पाऊल उचलल्यान्यामागे नेमके कारण काय होते, असा सवाल आता पोलीस यंत्रणेसमोर आहे. तसेच यावेळी ही महिला डॉक्टर फलटणमधील एका नामांकित हॉटेलमध्ये काय करत होती, असा सवालही आता उपस्थित होत आहे.
मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरने हातावर आत्महत्येचे कारण स्पष्टपणे लिहिले आहे. पीएसआय गोपाल बदनेनं चारवेळा बलात्कार केल्याचे या महिलेने हातावर नमूद केले आहे. "माझ्या मरण्याचे कारण PSI गोपाल बदने आहे. त्याने माझा चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला ४ महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला," असं या महिला डॉक्टरच्या हातावर लिहिलेले आहे.
गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. फलटण येथील नामांकित हॉटेलमध्ये बंद खोलीत महिला डॉक्टरने तिचे जीवन संपविले. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेली ही डॉक्टर या नामांकित हॉटेलमध्ये काय करत होती, या प्रश्नाचे उत्तर देखील पोलिसांना शोधावे लागणार आहे. पोलीस अधिकारी या प्रकरणात असल्याने पोलिसांवरही दबाव येण्याची शक्यता आहे. प्रकरण नाजूक असल्याने आणि शासकीय यंत्रणेवर गंभीर आरोप असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि याचा तपास देखील पोलीस करणार आहेत, अशी माहिती दिली.
लोकमतच्या वृत्तास दुजोरा
दरम्यान, गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे 'दैनिक लोकमत'ने उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या भोंगळ कारभारावर तसेच सर्व सामान्य नागरिकांवर अन्याय होत असल्याचे तसेच पोलिसांच्या सांगण्यावरून आरोपींचे वैद्यकीय अहवाल बदलले जात असल्याचे वृत्त दिले होते या वृत्तास या घटनेने दुजोरा मिळाला आहे. या घटनेमुळे गुन्हेगार, पोलीस यांचे मोठमोठे घोटाळे आता समोर येण्याची शक्यता आहे.