उत्तर प्रदेशमध्येभाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याची हत्या करण्यात आली. ज्या पद्धतीने ही हत्या करण्यात आली ते पाहून पोलिसांनाही धक्का बसला आहे. भाजपा नेते गुलफाम सिंह यादव यांची दिवसाढवळ्या विषारी इंजेक्शन देऊन हत्या करण्यात आली होती. ७० वर्षांचे गुलफाम त्यांच्या घराजवळ बसले होते. तेव्हा अचानक बाईक तीन तरुण त्याच्याकडे आले आणि त्यांच्याशी जबरदस्तीने बोलू लागले. काही समजण्यापूर्वीच हल्लेखोरांनी त्यांना विषारी इंजेक्शन टोचलं आणि तेथून पळून गेले.
कुटुंबीयांनी त्यानंतर गुलफाम यांना ताबडतोब गुन्नौर सामुदायिक आरोग्य केंद्रात नेलं, परंतु जेव्हा त्याची प्रकृती गंभीर झाली तेव्हा त्यांना अलीगढ येथे रेफर करण्यात आलं. पण रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. भाजपा नेत्याच्या हत्येची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी पोहोचला. मृतदेहाचे पोस्टमॉर्टम अलीगढमध्ये करण्यात आले आणि आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.
बाईकने आले, पाया पडले अन्...
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी बाईकवरून तीन जण गुलफाम सिंह यादव यांच्याकडे पोहोचले. त्यांच्या पाया पडल्यानंतर त्यांच्याशी बोलू लागले. याच दरम्यान, एका आरोपीने त्यांच्या पटकन पोटात विषारी इंजेक्शन दिलं. गुन्हा केल्यानंतर, आरोपी पळून जाऊ लागले, गुलफाम यांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण काही पावलं चालल्यानंतर ते खाली पडले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.
सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
या घटनेमुळे गुलफाम सिंह यांच्या समर्थकांमध्ये शोककळा पसरली आहे. कुटुंबातील सदस्यांची अवस्था वाईट आहे. सध्या पोलीस आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी केली आहे. बोटांचे ठसे यासह इतर पुरावे गोळा करण्यात आले आहेत. घटनास्थळावरून आरोपीचे हेल्मेट आणि नीडल जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. सीसीटीव्हीमधून काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत, ज्यामुळे हल्लेखोरांना लवकर अटक होण्याची शक्यता आहे, असा दावा केला जात आहे.