सांगवीत मोटारीच्या धडकेने रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 20:14 IST2019-06-17T20:13:40+5:302019-06-17T20:14:37+5:30
भरधाव मोटारीची धडक बसून रिक्षामधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला...

सांगवीत मोटारीच्या धडकेने रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू
पिंपरी : भरधाव मोटारीची धडक बसून रिक्षामधील एका प्रवाशाचा मृत्यू झाला. या अपघातात रिक्षाचालकासह दोघे जखमी झाले आहेत. जुनी सांगवी येथे सांगवी फाट्यालगत रविवारी (दि. १६) हा अपघात झाला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी रिक्षाचालक अंगद विनायक तरंगे (वय ३१, रा. सरकारनगर, पवारवस्ती, मारुंजी) यांनी फिर्याद दिली आहे. लाल रंगाच्या मोटारीतील अनोळखी चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सांगवी फाटा येथे पुलालगत रस्त्यावरून रविवारी रिक्षाचालक आंगद तरंगे आणि त्याच्या पाठिमागे दोन प्रवासी बसून जात होते. त्यावेळी (एमएच ०४ सीटी १३०९0 या क्रमांकाची लाल रंगाची चारचाकी मोटार भरधाव वेगात आली. मोटारीतील अनोळखी चालकाने वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून अविचाराने हयगयीने मोटार चालवून तरंगे यांच्या रिक्षाला धडक दिली. या अपघातात फियार्दी रिक्षाचालक तरंगे यांच्यासह रिक्षात पाठिमागे बसलेल्या दोन प्रवाशांपैकी एका प्रवाशाला किरकोळ मार लागला. तसेच गंभीर जखमी झाल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. यात रिक्षाचेही नुकसान झाले. अपघातानंतर मोटारचालक घटनास्थळी न थांबता पळून गेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.