कैद्याचा पोलिसावर प्राणघातक हल्ला; हवालदाराने स्वसंरक्षार्थ झाडल्या गोळ्या, आरोपीचा जागीच एन्काऊंटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 17:38 IST2026-05-17T17:18:47+5:302026-05-17T17:38:18+5:30

पंजाबमध्ये एका कैद्याने पोलिसावर हल्ला केल्यानंतर त्याचा एन्काऊंटर करण्यात आला.

Prisoner killed in self defence after attacking cop with knife inside e rickshaw in Punjab | कैद्याचा पोलिसावर प्राणघातक हल्ला; हवालदाराने स्वसंरक्षार्थ झाडल्या गोळ्या, आरोपीचा जागीच एन्काऊंटर

कैद्याचा पोलिसावर प्राणघातक हल्ला; हवालदाराने स्वसंरक्षार्थ झाडल्या गोळ्या, आरोपीचा जागीच एन्काऊंटर

Punjab Crime: पंजाबमधील होशियारपूरमध्ये शनिवारी दुपारच्या सुमारास एका कुख्यात कैद्याचा एन्काऊंटर करण्यात आला. पोलिसांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत हा कैदी ठार झाला. मेडिकल चेक-अप करून परतत असताना बेड्या लावलेल्या कैद्याने पोलिसांवर चाकूने हल्ला करुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस हवालदाराने जीव धोक्यात घालून शेवटपर्यंत कैद्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्ला सुरुच असल्याने हवालदाराने नाईलाजाने त्या कैद्याचा एन्काऊंटर केला. या संपूर्ण थराराचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ई-रिक्शात सुरू झाली झुंज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दुपारी १:३० च्या सुमारास चार पोलीस कर्मचारी तीन कैद्यांना होशियारपूर सेंट्रल जेलमधून कोर्टात हजर करण्यापूर्वी रूटीन मेडिकल चेक-अपसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले होते. तपासणी संपवून परतत असताना, पोलीस हवालदार जसदीप सिंह हे नसीब सिंह नावाच्या कैद्याला ई-रिक्शातून अ‍ॅम्ब्युलन्सकडे घेऊन जात होते.

हातात बेड्या असतानाही नसीबने अचानक पळून जाण्याचा प्रयत्न केला. जसदीप सिंह यांनी त्याला पकडताच, नसीबने त्याच्याकडे लपवून ठेवलेल्या चाकूने  एकापाठोपाठ एक सपासप वार करण्यास सुरुवात केली. ई-रिक्शात सुरू झालेली ही जीवघेणी हाणामारी काहीच वेळात रस्त्यावर आली.

स्वसंरक्षार्थ गोळीबार

नसीब सिंह हा प्रचंड आक्रमक होता आणि तो सातत्याने जसदीप सिंह यांच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायावर वार करत होता. जसदीप सिंह हे दम्याचे रुग्ण आहेत, तरीही त्यांनी कमालीचे शौर्य दाखवत नसीबला घट्ट पकडून ठेवले. यादरम्यान दोघेही जमिनीवर कोसळले.

नसीबने जसदीप यांची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर हिसकावण्याचा प्रयत्न केला. जसदीप सिंह यांनी सुरुवातीला जमिनीच्या दिशेने वॉर्निंग फायर केला आणि नसीबला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. पण नसीबने बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न सुरूच ठेवल्यामुळे अखेर जसदीप यांनी स्वसंरक्षार्थ थेट गोळी झाडली. गोळी लागल्याने जखमी झालेल्या नसीबला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मृत नसीब आणि त्याच्या बापाचाही गुन्हेगारी इतिहास

ठार झालेला कैदी नसीब सिंह हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि अंमली पदार्थ तस्करी अंतर्गत तब्बल ७ गंभीर गुन्हे दाखल होते. तो अमली पदार्थांच्या तस्करीच्या गुन्ह्यात आधीच दोषी सिद्ध झाला होता. नसीबचे वडील शशी हे देखील वेगवेगळ्या हत्या आणि ड्रग्ज तस्करीत सध्या जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत.

हॉस्पिटलमध्ये चाकू आला कुठून?

गंभीर जखमी झालेले जसदीप सिंह यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्यातबाहेर आहे. मात्र, या घटनेने पंजाब पोलीस प्रशासनात खळबळ उडवून दिली आहे. अतिसुरक्षा असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात आणि पोलिसांच्या ताब्यात असताना नसीब सिंहकडे धारदार चाकू आला कुठून? त्याला तो कोणी पुरवला? याच्या तपासासाठी एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. 

Web Title : पंजाब: कैदी ने पुलिस पर किया हमला, आत्मरक्षा में गोली लगने से मौत

Web Summary : पंजाब में एक कैदी ने मेडिकल जांच के दौरान पुलिस पर चाकू से हमला किया। बार-बार हमले के बाद आत्मरक्षा में पुलिस अधिकारी ने गोली मारकर कैदी को मार डाला। घटना की जांच जारी है।

Web Title : Punjab: Prisoner attacks police, gets shot in self-defense, dies

Web Summary : In Punjab, a prisoner attacked police with a knife while being escorted for a medical check-up. A police officer, acting in self-defense after being repeatedly attacked, shot and killed the prisoner. The incident is under investigation.