योगेश पांडेनागपूर - महाराष्ट्रात मागील दीड ते दोन वर्षांत कोट्यवधींच्या बनावट इंजेक्शन्सची विक्री झाल्याची बाब समोर आली आहे. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल कामोठे येथील आरआरटी फार्माचा मालक रितेश ठोंबरे हा या गोरखधंद्याचा महाराष्ट्रातील महत्त्वाचा दुवा आहे. त्याने पुणे व आजूबाजूच्या परिसरातही विक्रीचे जाळे रचले होते. मागील वर्षी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता.
नागपुरातील तुलसीनगरातील हितांशी फार्मास्युटिकल्स येथे बनावट औषधांचा साठा सापडला. आरोपी रिलायन्स लाइफ केअरच्या नावाखाली ॲलब्युरेलचा बनावट साठा राजू मिश्रा याच्या चंडीगड येथील ग्लास्को फार्मास्युटिकल्स येथे तयार करत होते. महाराष्ट्रात बाहेरील राज्यांतील डिस्ट्रिब्युटर्सच्या माध्यमातून रितेश ठोंबरेकडे हा बनावट साठा यायचा. चंडीगडची कंपनी वगळता इतर ठिकाणी ‘बिल’ दाखविले जायचे. रितेशला औषधे पुरविण्यात दिल्लीतील दानीश खान या औषध दलालाचा मोठा हात असायचा.
ठोंबरेकडून सहकार्यास नकारनागपुरातील प्रकरणात अन्न व औषधी विभागाच्या पथकाच्या चौकशीत ठोंबरेचा सहभाग मार्च महिन्याच्या अखेरीस समोर आला. त्याला बनावट ॲलब्युरेलचा साठा कुठून आला याची विचारणा केली होती. मात्र, ठोंबरेने व्यवसाय बंद केल्याची माहिती दिली.
ठोंबरे, खानविरोधात पुण्यातही गुन्हारितेश ठोंबरे व दानीश खान या दोघांविरोधात पुण्यातही गुन्हा दाखल आहे. दोघांनी पुण्यातील श्रीराम हेल्थ केअर शॉपचा मालक श्रीराम नंदकिशोर चांडक, सदाशिव पेठेतील आरएसएलचा मालक राजेश शांताराम जोग, त्याचा पार्टनर मुंबईतील वरळी बीडीडी चाळीमधील श्रीशैलम राजय्या गटला व प्रिझेम ट्रेडर्स यांच्यासोबत मिळून बनावट ॲलब्युरेलची विक्री केली होती.
जुलै ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत त्यांनी चांडक व जोगाच्या माध्यमातून बनावट इंजेक्शन मोठ्या प्रमाणात ग्राहकांच्या माथी मारले होते. पुण्यातील अन्न व औषध विभाग सहआयुक्त कार्यालयातील औषध निरीक्षक श्रृतिका जाधव यांच्या तक्रारीवरून या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यावेळी ठोंबरे विरोधात थेट कारवाई झाली नाही. आता तर त्याने हात वर केले आहेत.