NCPच्या विद्यमान महिला सरपंचाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत सापडल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 20:25 IST2021-12-27T20:24:38+5:302021-12-27T20:25:19+5:30
Murder Case : दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रस्त्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर मीनाक्षी यांचा मृतदेह गावातील एका व्यक्तीला दिसून आला.

NCPच्या विद्यमान महिला सरपंचाचा मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत सापडल्याने खळबळ
सिकंदर अनवारे
महाड - तालुक्यातील आदीस्ते गावच्या सरपंच मीनाक्षी खिडबीडे यांचा मृतदेह आज दुपारी याच परिसरात जंगलात आढळल्याने आदीस्ते परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मीनाक्षी खिडबीडे या आदीस्ते गावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान सरपंच होत्या.
आदीस्ते गावाच्या सरपंच मीनाक्षी खिडबीडे या आज (२७ डिसेंबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमरासा चुलीसाठी लाकडे गोळा करण्यासाठी घरातून बाहेर पडल्या होत्या.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास रस्त्यापासून सुमारे शंभर मीटर अंतरावर मीनाक्षी यांचा मृतदेह गावातील एका व्यक्तीला दिसून आला. त्याने ही माहिती गावात सांगितली. यावरून पोलीस पाटील यांनी महाड तालुका पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीस पथकाने आदीस्ते गावात धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा करून रात्री उशिरा मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे. मृत महिलेच्या डोक्यात लाकडाचा फटका मारला असून रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळल्याने मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.