बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 09:12 IST2026-05-18T09:12:40+5:302026-05-18T09:12:57+5:30

मेक्सिकोच्या प्यूब्ला राज्यात झालेल्या भीषण गोळीबारात एका चिमुरड्यासह १० जणांचा मृत्यू झाला आहे.

Oh my! 10 people, including 6 men and a young child, killed in broad daylight shooting in Mexico | बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू

बापरे! मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, ६ पुरुष आणि एका लहान मुलासह १० जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय स्तरावर अमली पदार्थांची तस्करी आणि टोळीयुद्धासाठी कुप्रसिद्ध असलेल्या मेक्सिकोमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित थरार पाहायला मिळाला आहे. मेक्सिकोच्या पूर्व-मध्य भागातील प्यूब्ला राज्यामधील तेहुइत्जिंगो या शहरात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एका चिमुरड्यासह १० जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेच्या कारणास्तव स्थानिक नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

प्यूब्लाच्या सार्वजनिक सुरक्षा एजन्सीने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, रविवारी झालेल्या या गोळीबारातील मृतांमध्ये ६ पुरुष, ३ महिला आणि एका निष्पाप लहान मुलाचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर फेडरल अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून तपास सुरू केला आहे.

संशयितांबद्दल गुप्तता; पोलीस यंत्रणा चक्रावून गेली

स्थानिक प्रशासनाने आणि पोलिसांनी या हत्याकांडाबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे किंवा कोणताही संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार हा हल्ला स्थानिक ड्रग कार्टेलच्या वर्चस्वाच्या लढाईतून झाला असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. प्यूब्लाचे गव्हर्नर अलेजांद्रो अर्मेंटा यांनी या रविवारी घडलेल्या संवेदनशील घटनेवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा टिप्पणी दिलेली नाही, ज्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

हिंसाचारामुळे ८०० ते १,००० कुटुंबांचे पलायन!

मध्य मेक्सिकोमध्ये गेल्या काही महिन्यांत गुन्हेगारी टोळ्यांच्या आणि ड्रग कार्टेलच्या हिंसाचारात अचानक प्रचंड वाढ झाली आहे. या भागात वर्चस्व राखण्यासाठी टोळ्या एकमेकांवर आधुनिक शस्त्रास्त्रांनी हल्ले करत आहेत. या रक्तरंजित संघर्षाचा फटका तिथल्या स्थानिक नागरिकांना बसत आहे. वाढत्या हिंसाचारामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी या भागातील जवळपास ८०० ते १,००० कुटुंबांना आपली घरेदार सोडून सुरक्षित स्थळी पळून जावे लागले आहे. ही विस्थापित कुटुंबे आता इतर शहरांमध्ये आश्रयाला जात आहेत.

प्यूब्ला शहरात आधीही झाला होता नरसंहार

या भागात गोळीबाराची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात प्यूब्ला राज्यातीलच 'ह्यूहुएटलान एल ग्रांडे' या शहरात अशाच प्रकारच्या गोळीबारात ६ लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच, प्यूब्लाच्या राजधानीत एका चालत्या वाहनावर अज्ञात बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला होता, ज्यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला होता. पाठोपाठ घडणाऱ्या या धक्कादायक घटनांमुळे मेक्सिकोमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असून, सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Web Title: Oh my! 10 people, including 6 men and a young child, killed in broad daylight shooting in Mexico