मला हे नातं नकोय... मंगळसूत्र, जोडवी टेबलावर आपटत आई-वडील निघून गेले; मुलींना पोलीस ठाण्यातच टाकलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 14:51 IST2026-04-29T14:44:00+5:302026-04-29T14:51:53+5:30
तेलंगणामध्ये समुपदेशादरम्यान आई वडिलांनी दोन लहान मुलींना पोलीस ठाण्यात सोडून पळ काढला.

मला हे नातं नकोय... मंगळसूत्र, जोडवी टेबलावर आपटत आई-वडील निघून गेले; मुलींना पोलीस ठाण्यातच टाकलं
Telangana Couple Crime: रागाच्या भरात माणूस किती टोकाचं पाऊल उचलू शकतो, याचा एक धक्कादायक उदाहरण तेलंगणातील करीमनगर जिल्ह्यात आला. कौटुंबिक वादातून एका दाम्पत्याने चक्क पोलीस ठाण्यातच आपल्या दोन चिमुरड्या मुलींना वारऱ्यावर सोडून पळ काढला. आईने रागाच्या भरात आपले मंगळसूत्र आणि जोडवी काढून टेबलावर फेकली आणि तिथून निघून गेली. तर मागोमाग पित्यानेही रडणाऱ्या मुलींची पर्वा न करता तिथून पळ काढला.
मिळालेल्या माहितीनुसार, रवी कुमार आणि ललिता यांनी सुमारे १० वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. रवी हा दुकानदार असून ललिता नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. लग्नानंतर काही वर्षे सुखात गेल्यानंतर त्यांच्यात वादाची ठिणगी पडली. गेल्या काही काळापासून त्यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला होता की, प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले.
काऊन्सलिंग दरम्यान संतापाचा उद्रेक
२८ एप्रिल रोजी करीमनगरमधील लोअर मानैर डॅम पोलीस ठाण्यात या पती-पत्नीला समुपदेशनासाठी बोलावण्यात आले होते. पोलीस अधिकारी दोन्ही बाजूंना समजून सांगत असतानाच अचानक ललिताचा संयम सुटला. तिने संतापून स्वतःचे मंगळसूत्र आणि पायातील जोडवी काढून पोलिसांच्या समोर टेबलावर आपटली. मला हे नातं नकोय आणि या मुलींची जबाबदारीही नकोय, असे ओरडत ती तरातरा पोलीस ठाण्याबाहेर निघून गेली.
पत्नी पाठोपाठ पती रवी कुमार यानेही मुलींकडे ढुंकूनही न पाहता पोलीस ठाण्यातून काढता पाय घेतला. आपल्या डोळ्यादेखत आई-वडील सोडून गेल्याचे पाहून दोन्ही चिमुरड्या मुली घाबरून ढसाढसा रडू लागल्या.
खाकी वर्दीतील माणुसकी
आई-वडिलांनी वाऱ्यावर सोडलेल्या त्या मुलींना पाहून पोलीसही हेलावले. पोलिसांनी तात्काळ मुलींना सावरले, त्यांना खाऊ दिला आणि त्यांचे रडणे थांबवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोन्ही पालकांना वारंवार फोन केले, मात्र दोघांनीही फोन उचलले नाहीत. अखेर पोलिसांनी मुलींच्या आजीला संपर्क करून पोलीस ठाण्यात बोलावले आणि दोन्ही मुलींना त्यांच्या स्वाधीन केले.
गुन्हा नाही, पण पोलिसांची नजर
याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र, तेलंगणा पोलीस या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून आहेत. "त्या मुलींची सुरक्षितता आणि त्यांचे भविष्य हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. रागाच्या भरात पालकांनी घेतलेला हा निर्णय मुलांच्या मनावर गंभीर परिणाम करू शकतो," असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.