अवघ्या ८०० रुपयांसाठी दगडाने ठेचून केली फिरस्त्याची हत्या; ओळख लपविण्यासाठी आरोपी घालायचा ‘टोपी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 12:26 IST2026-04-30T12:25:18+5:302026-04-30T12:26:36+5:30
खडवली येथील भातसा नदीच्या पात्राजवळ २१ एप्रिलला एका व्यक्तीचा चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला हाेता. कल्याण तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा केला

अवघ्या ८०० रुपयांसाठी दगडाने ठेचून केली फिरस्त्याची हत्या; ओळख लपविण्यासाठी आरोपी घालायचा ‘टोपी’
जितेंद्र कालेकर
ठाणे - नदीत अंघोळीसाठी जाताना जवळ ठेवण्यासाठी दिलेले अवघे ८०० रुपये परत न दिल्याच्या कारणावरून राजेश प्रभूळकर (४९, सध्या रा. शिवडी, मुंबई) या फिरस्त्याचा दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना कल्याण तालुक्यातील खडवली येथे घडली. या प्रकरणी ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई आणि ठाण्यातील तब्बल ३५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून योगेश राणे (४०, मूळ रा. श्रीवर्धन, रायगड) या सराईत गुन्हेगाराला लोअर परळ येथून अटक केली.
कल्याणजवळील ज्युगाव, खडवली येथील भातसा नदीच्या पात्राजवळ २१ एप्रिलला एका व्यक्तीचा चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला हाेता. कल्याण तालुका पोलिसांनी खुनाचा गुन्हा केला. आराेपीला शाेधण्याचे आव्हान असल्यामुळे ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी तपासासाठी ७ विशेष पथके नेमली. पथकाने एन. एम. जोशी मार्ग पोलिसांच्या मदतीने गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गीते, उपनिरीक्षक महेश कदम आणि सहायक पाेलिस निरीक्षक नितीन मुदगुन व पथकाने त्याला बेड्या ठाेकल्या.
आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार
आरोपी योगेश आणि राजेश हे दोघेही मित्र होते. ते मुंबईत पदपथावर किंवा पुलाखाली राहायचे आणि मिळेल तिथे केटरिंगचे काम करायचे. २० एप्रिल रोजी दोघे खडवली येथे नदीवर अंघोळीसाठी गेले होते. अंघोळीला जाताना योगेशने स्वतःकडील ८०० रुपये राजेशकडे दिले. अंघोळ झाल्यावर परतीच्या प्रवासाला निघताना योगेशने ते पैसे मागितल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. या रागातून योगेशने राजेशची हत्या केली.
‘बेली’मुळे तपासाला मिळाली दिशा
तपासादरम्यान घटनास्थळी पाचारण केलेले पोलिस श्वान ‘बेली’ हिने खडवली रेल्वे स्थानकापर्यंतचा मार्ग दाखवला. याच धाग्यामुळे पोलिसांनी खडवली ते मुंबईपर्यंतच्या ३० ते ३५ रेल्वेस्थानकांच्या परिसरातील सुमारे २५० सीसीटीव्ही फुटेजची तसेच इतर भागातील सुमारे १०० फुटेजची बारकाईने तपासणी केली. सीसीटीव्हीमध्ये संशयित आरोपी आपली ओळख लपविण्यासाठी कायम टोपी घालत असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे.