शाळेत शिरून ११ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या 'त्या' नराधमाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 00:29 IST2022-03-25T00:27:06+5:302022-03-25T00:29:01+5:30
मुलींनी सांगितलेल्या वर्णनावरुन 'या' नराधमाचे रेखाचित्र तयार करण्यात आले होते.

शाळेत शिरून ११ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या 'त्या' नराधमाला अटक
पुणे- जंगली महाराज रोडवरील एका मुलींच्या शाळेत शिरुन, ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने जनवाडी येथील एका दारू गुत्यावरून रात्री ताब्यात घेतले. मंगेश तुकाराम पदुमले (वय ३६, रा. गुंजाळवाडी, पांडवनगर) असे या नराधम आरोपीचे नाव आहे. मंगेश हा शाळेजवळच्या एका शोरुममध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.
मुलींनी सांगितलेल्या वर्णनावरुन त्याचे रेखाचित्र तयार करण्यात आले होते. यावरुन युनिट १च्या पथकाने सर्वत्र शोध सुरु केला. यात हा येथील एका शोरुममध्ये एकच दिवस कामाला आल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक शैलेश संख्ये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश बामगुडे यांच्या पथकाने जनवाडीतील एका दारु गुत्यावर त्याला पकडले.
तत्पूर्वी, ही घटना एका मुलींच्या शाळेत बुधवारी सकाळी अकरा-साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी डेक्कन जिमखाना परिसरात राहणार्या एका ४० वर्षांच्या महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
यासंदर्भात, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची ११ वर्षाची मुलगी जंगली महाराज रोडवरील शाळेत शिकते. ती बुधवारी सकाळी शाळेत गेली होती. यावेळी एक जण शाळेत आला व त्याने या मुलीशी ओळख असल्याचा बहाणा करून तिला ढकलत ढकलत शाळेच्या बाथरुममध्ये नेले आणि तेथे तिचे तोंड दाबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यानंतर बाहेर कुणाला काही सांगितलेस तर बघ, अशी धमकी देऊन तेथून निघून गेला.
या घटनेनंतर संबंधित मुलीने आपल्या मैत्रिणीला हा संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर त्यांनी शाळेतील शिक्षिकांना याची माहिती दिली. यावर, त्यांनी तातडीने मुलीच्या आईला व पोलिसांना शाळेत बोलावून घेतले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेत धाव घेत घटनेची माहिती घेतली होती.