युट्यूबर सलीमवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा एन्काउंटर; मुख्यमंत्री योगींच्या इशाऱ्यानंतर मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 08:36 IST2026-03-02T08:35:42+5:302026-03-02T08:36:25+5:30
गाझियाबादमधील लोनी येथे युट्यूबर सलीम वास्तिक यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी झिशानचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे.

फोटो - आजतक
गाझियाबादमधील लोनी येथे युट्यूबर सलीम वास्तिक यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी झिशानचा पोलिसांनी एन्काउंटर केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोनी भागात झालेल्या या एन्काउंटरदरम्यान झिशानला दोन गोळ्या लागल्या होत्या. त्याला जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. झिशान हा मूळचा अमरोहाचा रहिवासी होता.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कालच सलीम यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या इशाऱ्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीचा खात्मा केला आहे. सध्या या भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
नेमकं काय घडलं?
शुक्रवारी सकाळी बाईकवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी सलीम यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर चाकूने वार केले होते. हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर आणि पोटावर गंभीर जखमा केल्या होत्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सलीम यांना तातडीने दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्या मानेवर शस्त्रक्रिया केली असून, आणखी एक शस्त्रक्रिया बाकी आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
सलीम वास्तिक कोण आहेत?
सलीम वास्तिक हे स्वतःला 'एक्स मुस्लिम' मानतात आणि युट्यूबवर व्हिडीओ बनवतात. त्यांच्या या कंटेंटमुळे सोशल मीडियावर त्यांना अनेकदा धमक्या आणि विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यांच्या वक्तव्यांमुळेच ते काही कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास करून झिशानचा शोध घेतला. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.