फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 13:14 IST2025-11-28T13:13:21+5:302025-11-28T13:14:26+5:30
Kapil Sharma : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्याच्या कटातील आरोपी बंधू मानसिंह सेखोनला अटक केली आहे.

फोटो - ndtv.in
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्याच्या कटातील आरोपी बंधू मानसिंह सेखोनला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंधू मानसिंहने गोळीबार करणाऱ्यांना शस्त्रं आणि वाहन पुरवलं होतं. गोळीबारात तो सहभागी नसला तरी, तो संपूर्ण कटाचा भाग होता. कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करण्यासाठी गोळीबार करणाऱ्यांनी वापरलेलं वाहन कॅनडाच्या पोलिसांनी ओळखलं. त्यानंतर मानसिंह ऑगस्टमध्ये कॅनडाहून भारतात पळून गेला.
दिल्ली पोलिसांनी शस्त्र तस्करी करणाऱ्या एका गँगला अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी लुधियानामध्ये बंधू मानसिंहला शस्त्र पुरवल्याचं उघड झालं. या सुगावाच्या आधारे पोलिसांनी बंधू मानसिंहला अटक केली. बंधू मानसिंहवर अनेक गुन्हे दाखल आहेत. अटकेदरम्यान, त्याच्याकडून चीनमध्ये बनवलेलं एक उच्च दर्जाचे PX-३ पिस्तूल आणि ८ जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली.
कॅनडामधील कपिल शर्माच्या KAP's कॅफेवर गोळीबार करणाऱ्या शूटरला दिल्लीत अटक
बंधू मानसिंहचा एक व्हिडिओही समोर आला आहे, ज्यामध्ये तो कॅनडातील एका बर्फाळ भागात बंदुकीने गोळीबार करताना दिसत आहे. गोल्डी ढिल्लोन गँग ही भारत-कॅनडा स्थित नेटवर्क आहे आणि बंधू मानसिंह या गँगचा प्रमुख असल्याचं म्हटलं जातं. कपिल शर्माच्या कॅफेमध्ये गोळीबार कसा झाला आणि त्यात कोण कोण सामील होतं याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
जुलैमध्ये ब्रिटिश कोलंबियातील सरे येथे सुरू केलेल्या कपिल शर्माच्या 'कॅप्स कॅफे'ला अज्ञात व्यक्तींनी १० जुलै रोजी टार्गेट केलं होतं, त्यानंतर ७ ऑगस्ट आणि १६ ऑक्टोबर रोजी आणखी दोन हल्ले झाले. या घटनांमध्ये कोणीही जखमी झालं नाही. कपिल शर्माला त्याच्या कॅफेमध्ये झालेल्या गोळीबाराबद्दल विचारलं असता तो म्हणाला, "खरं तर, गोळीबाराच्या घटनेनंतर, आमच्या कॅफेमध्ये अधिक लोक येत आहेत. म्हणून जर देव माझ्यासोबत असेल तर सर्व काही ठीक आहे."