इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:11 IST2025-07-02T19:10:50+5:302025-07-02T19:11:30+5:30
२२ वर्षीय गुरमीत कौरने इन्स्टाग्रामवर रील लाईक केल्यानंतर शेजारच्या निखिल अरोरा या तरुणाशी बोलायला सुरुवात केली. काही दिवसांच्या चॅटिंगनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.

फोटो - आजतक
कानपूरच्या गोविंद नगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. २२ वर्षीय गुरमीत कौरने इन्स्टाग्रामवर रील लाईक केल्यानंतर शेजारच्या निखिल अरोरा या तरुणाशी बोलायला सुरुवात केली. काही दिवसांच्या चॅटिंगनंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. कुटुंबातील सदस्यांच्या संमतीशिवाय गुरमीतने निखिलशी कोर्टात जाऊन लग्न केलं आणि सासरच्या घरी गेली.
लग्नाच्या एका वर्षातच गुरमीत एका मुलाची आई झाली. काही दिवसांनी दोघांमध्ये खूप वाद सुरू झाले. निखिलने गुरमीतला मारहाण करून त्रास देण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्रास सहन न झाल्याने गुरमीत तिच्या माहेरी परत आली. वडील महेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीने अनेक वेळा पोलीस ठाण्यात तक्रार केली. निखिल तिच्यासोबत राहण्यास तयार नव्हता.
रविवारी गुरमीतने निखिलला फोन करून तिला सासरी सोबत घेऊन जाण्यास सांगितलं, परंतु निखिलने यासाठी पुन्हा एकदा नकार दिला आणि त्याचे आता तिच्याशी कोणतेही संबंध नाहीत असं सांगितलं. यामुळे दुःखी होऊन गुरमीतने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली.
गुरमीतच्या वडिलांनी निखिल आणि त्याच्या आईविरुद्ध गोविंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रदीप कुमार सिंह म्हणाले की, तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.