Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 17:05 IST2025-10-04T17:04:27+5:302025-10-04T17:05:29+5:30
रामलीला कार्यक्रमादरम्यान डान्सरवर पैसे उधळले आणि विरोध केल्यास पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

फोटो - आजतक
कानपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या नेत्याने केलेल्या गुंडगिरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामलीला कार्यक्रमादरम्यान डान्सरवर पैसे उधळले आणि विरोध केल्यास पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी अमितेश शुक्ला याला अटक केली आहे. ५२ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला, ज्यामुळे पोलिसांनी त्वरीत कारवाई केली.
सचेंडी पोलीस स्टेशन परिसरात ही घटना घडली. भौंती गावात रामलीला कार्यक्रम सुरू होता. भाजपा युवा मोर्चाशी संबंधित अमितेश शुक्ला या कार्यक्रमासाठी पोहोचला होता. कार्यक्रमादरम्यान अमितेश शुक्ला याने कलाकारांवर आणि डान्सरवर पैशांचा वर्षाव केल्याचा आरोप आहे. रामलीला समितीच्या सदस्यांनी आणि आयोजकांनी अमितेश शुक्लाच्या वर्तनावर आक्षेप घेतला तेव्हा तो संतापला. तसेच नेत्याने पिस्तूल काढलं आणि समिती सदस्यावर रोखलं.
कानपुर के सचेंडी में रामलीला में बतौर विशिष्ट अतिथि बनकर गए भाजपा नेता अमितेश शुक्ला ने एक युवक के पिस्टल लगाकर कर जान से मारने की धमकी दी। युवक के पेट में पिस्टल लगाकर भाजपा नेता ने धमकाते हुए कहा कि चट से गोली मारूंगा कोई बचा नहीं पाएगा। घटना से जुड़ा 52 सेकेंड का वीडियो सोशल… pic.twitter.com/G7eCraODUt
— PANKAJ CHOUDHARY (@PANCHOBH) October 4, 2025
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, आरोपी नेता तरुणाला धमकी देत आहे. "मी तुला पटकन गोळी मारेन, तुला कोणीही वाचवू शकणार नाही" असं देखील म्हणत आहे. या घटनेमुळे रामलीला पाहण्यासाठी आलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई केली, घटनेची दखल घेतली.
एडीसीपी कपिल देव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घरावर छापा टाकला आणि अमितेश शुक्लाला पिस्तूलसह अटक केली. आरोपीची चौकशी केली जात आहे आणि या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे. भाजपा आमदार महेश त्रिवेदी यांच्यासोबत अमितेश शुक्लाचे फोटोही समोर आले आहेत.