नाशिकच्या डॉक्टरसोबत 'जमताडा' पॅटर्न! साडेतीन कोटींना गंडवणारा सापडला मध्य प्रदेशात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 16:50 IST2025-11-27T16:48:36+5:302025-11-27T16:50:55+5:30
नाशिक पोलिसांकडे एका डॉक्टरने तक्रार दिली. हे प्रकरण सायबर शाखेकडे देण्यात आले आणि त्यानंतर तपास सुरू झाला. या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.

नाशिकच्या डॉक्टरसोबत 'जमताडा' पॅटर्न! साडेतीन कोटींना गंडवणारा सापडला मध्य प्रदेशात
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर जादा नफा व परताव्याचे आमिष दाखवून दिंडोरीतील एका डॉक्टरला तब्बल ३ कोटी ६४ लाख ९ हजार ३०० रुपयांना सायबर गुन्हेगाराने ऑनलाइन गंडा घातला होता. या गुन्ह्याचा छडा लावत नाशिक ग्रामीण सायबर पोलिसांनी मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील नागोर येथून एकास ताब्यात घेतले आहे. संशयित अखलाख रईस पटेल असे अटक केलेल्या बँक खातेधारकाचे नाव असून त्याच्याकडून १५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
शेअर मार्केटमधून जास्त नफा मिळवून देतो असे सांगत डॉक्टरला तब्बल साडेतीन कोटींना गंडा घातला होता. याप्रकरणी त्यांनी २० ऑक्टोबर रोजी नाशिक ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली होती.
सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या पथकाने तपासाला गती दिली. पोलिसांनी बँक खाते व फसवणूक करणाऱ्या व्यक्तींची तांत्रिक माहिती घेण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीच्याआधारे नागोरमध्ये पथक जाऊन धडकले. तेथे शोध घेत सापळा रचून संशयित अखलाख यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
बँक खात्यात तीन राज्यांतून दीड कोटी
ग्रामीण पोलिसांनी पटेल याची अधिक चौकशी केली असता त्याच्या बँक खात्यात तब्बल दीड कोटी रुपये वर्ग झाल्याचे आढळले. ही रक्कम महाराष्ट्र कर्नाटक व झारखंड राज्यांमधील वेगवेगळ्या बँक खात्यातून आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
संशयिताने सायबर गुन्हेगारांशी हातमिळवणी करत स्वतःच्या नावावरील बँक खाते कमिशन मिळविण्याच्या आमिषाने वापरण्यास दिल्याचे प्रथमदर्शनी तपासात पुढे आले आहे.
सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना कमिशनचे आमिष दाखवून २.५ टक्के एका आर्थिक व्यवहाराचा मोबदला ठरवून देत बँकांमधील त्यांच्या नावे असलेले चालू खात्यांचा वापर केला जात असल्याचे तपासातून समोर आले.