भयंकर! विधवा सून बॉयफ्रेंडसह दिसली शेतात; संतापलेल्या सासऱ्याने दोघांना बांधलं अन् लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 11:45 IST2025-12-01T11:44:26+5:302025-12-01T11:45:47+5:30
प्रेमप्रकरणातील एका भयानक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला.

फोटो - आजतक
राजस्थान जयपूरजवळील बाडोलाव गावात प्रेमप्रकरणातील एका भयानक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. शेतात असलेल्या एका जोडप्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळून टाकण्यात आलं. शनिवारी रात्री उशिरा विधवा सोनी गुर्जर तिचा बॉयफ्रेंड कैलाश गुर्जरला भेटण्यासाठी शेतात आली तेव्हा ही धक्कादायक घटना घडली.
कुटुंबातील सदस्यांना घटनेची माहिती मिळताच, महिलेचे सासरे बिरदीचंद गुर्जर आणि मेहुणे गणेश गुर्जर तिच्या मागे शेतात गेले. सोनी आणि कैलासला शेतात बसलेले पाहताच त्यांनी त्यांना बांधून ठेवलं, पेट्रोल ओतलं आणि त्यांना पेटवून दिलं. आरडाओरड सुरू असताना संपूर्ण शेत आगीत जळून खाक झालं.
आगीत गंभीररित्या भाजलेल्या दोन्ही प्रेमींना नंतर गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे त्यांची प्रकृती गंभीर आहे. कैलास अंदाजे ७०% भाजला आणि सोनी ४५% भाजली. दोघांनाही सवाई मान सिंह रुग्णालयाच्या बर्न युनिटमध्ये दाखल करण्यात आलं आहे, जिथे डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे.
घटनेची माहिती मिळताच जयपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक राशी डोगरा घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जळालेल्या शेतातील कुंपण आणि घटनास्थळावरील सर्व साहित्याची बारकाईने तपासणी केली. एसपी राशी डोगरा यांनी सांगितलं की गंभीर जखमी झालेल्या सोनी आणि कैलासने रुग्णालयात दिलेल्या जबाबात गणेश आणि बिरदीचंद यांचं नाव स्पष्टपणे सांगितलं होतं, त्यानंतर दोघांनाही अटक करण्यात आली.
सोनी गुर्जरच्या पतीचा सहा वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. तिला दोन मुलं आहेत. ९ वर्षांचा मुलगा आणि ७ वर्षांची मुलगी आहे. कैलाश गुर्जर विवाहित आहे आणि दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांच्या प्रेमात होते. सध्या दोन्ही आरोपी पोलीस कोठडीत आहेत आणि चौकशी सुरू आहे. गावात तणावाचे वातावरण आहे, तर जखमी असलेल्या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.