'शांत स्वभावाने माझा घात केला'; अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या, बुलडाण्यात संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 12:27 PM2021-09-24T12:27:54+5:302021-09-24T12:28:34+5:30

पाच दिवसांनंतर घटनेला वळण; दोन आरोपींना अटक

It has come to light that a cousin was raping his sister in a village in Buldana | 'शांत स्वभावाने माझा घात केला'; अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या, बुलडाण्यात संताप

'शांत स्वभावाने माझा घात केला'; अत्याचाराला कंटाळून तरुणीची आत्महत्या, बुलडाण्यात संताप

googlenewsNext

बुलडाणा: बुलडाणा तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय तरूणीने आत्महत्या केली होती. या आत्महत्येच्या सहा दिवसानंतर या घटनेला एक वेगळे वळण मिळाले आहे. कारण, आत्महत्या करणाऱ्यापूर्वी तरुणीने लिहलेल्या सुसाईट नोटमध्ये गावातीलच दोन तरुणांची नावे असून, त्यांनी वारंवार अत्याचार केल्याचेही त्यामध्ये नमुद आहे. यातील एक आरोपी हा संबंधीत तरुणीचा जवळचा नातेवाईक आहे. प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी दोन आरोपीविरुद्ध २३ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

बहिण भावाचे नाते अगदीच पवित्र नाते, मात्र याच नात्याला कलंक लावणारी घटना बुलडाणा तालुक्यातील एका गावात घडली आहे. वारंवार अत्याचार करणाऱ्या दोघांपैकी एकजण आत्महत्या करणाऱ्या तरुणीचा चुलत भाऊच असल्याचे समोर आल्याने जिल्हाभर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. २० सप्टेंबर रोजी एका १८ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठी घरातील एका धार्मिक ग्रंथांत पाच दिवसानंतर सापडली. चिट्ठी घेऊन तरुणीच्या वडिलांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. 

वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गावातीलच दोन तरुणांवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी तरुण असून, त्यांना गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास बुलडाणा ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरीश ताथोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सदानंद सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एकनाथ बावस्कर, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील करीत आहेत.

माझ्या शांत स्वभावाने घात केला- 

आत्महत्या करणाऱ्या पीडित तरुणीने लिहलेल्या चिठ्ठीत आरोपीने तिचा कसा-कसा छळ केला याचा उल्लेख केला आहे. वडिलांना सांगण्याची हिम्मत नव्हती, आणि वडिलांच्या प्रतिष्ठेचा विचार करून होणाऱ्या अत्याचाराला सहन करीत गेली, पण या शांत स्वभावाने माझा घात केला असा उल्लेख आत्महत्या करणाऱ्या तरुणीने चिठ्ठीत केला आहे.

जिल्ह्यात महिन्याकाठी ९ अत्याचार-

जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत ७४ अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. याची सरासरी काढल्यास जिल्ह्यात दर महिन्याला नऊ महिला, तरुणी विकृत वासनेला बळी पडत असल्याचे दिसून येते. ही बाब चिंतेसह चिंतन करायला लावणारी अशीच आहे. सामाजिक नातेसंबंधांना काळीमा फासणारी ही घटना आहे. अशा घटना व्यथीत करून जातात. मात्र, महिला आणि मुलींनी होणाऱ्या अत्याचाराबाबत कुटुंबियांना विश्वासात घेऊन सांगावे. भीती न बाळगता थेट पोलीस स्टेशन गाठावे, पोलीस तुमच्या सुरक्षेसाठीच आहेत.  -गिरीश ताथोड, पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन

Web Title: It has come to light that a cousin was raping his sister in a village in Buldana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.