नाशिक - जिल्ह्यात भोंदू अशोक खरातचे कारनामे चर्चेत असतानाच महिला लैंगिक शोषणाचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. घरगुती ताणतणाव, वैवाहिक अडचणी आणि मानसिक अस्वस्थतेचा गैरफायदा घेत निफाड तालुक्यातील धारणगाव (खडक) येथील एका भोंदूबाबाने महिलेचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार गुरुवारी लासलगाव पोलिस स्टेशनला दाखल झाली आहे. याप्रकरणी संशयित आरोपी भोंदूबाबा महेशगिरी ऊर्फ महेश दिलीप काकडे (वय ३१) याच्याविरुद्ध बलात्कारासह जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२८ वर्षाच्या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिचे दोन विवाह अपयशी ठरल्याने आणि मुलगी तिच्यासोबत नसल्याने ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. या परिस्थितीत तिच्या आई-वडिलांनी तिला धारणगाव (खडक) येथील म्हणून तथाकथित प्रतिगाणगापूर सांगितल्या जाणाऱ्या मठात नेले. तेथे भोंदूबाबा महेशगिरी काकडे हा स्वतःमध्ये दैवी शक्ती असल्याचा दावा करत महिलांवरील भुताटकी काढण्याचे काम करत असल्याचा आभास निर्माण करत होता. १५ ऑगस्ट २०२४ रोजी पीडित महिला आई-वडिलांसह मठात गेली असता, काकडे याने तिच्या अंगात 'करणीबाधा' असल्याचे सांगून तिला मठात दर पाच गुरुवारी येऊन विविध धार्मिक विधी करण्यास भाग पाडले. पुढे त्याने तिचा मोबाइल क्रमांक घेत सतत वैयक्तिक आणि अश्लील आशयाचे मेसेज पाठविण्यास सुरुवात केली. 'तू मला आवडतेस' 'तूपुन्हा लग्न करू नकोस, त्यापेक्षा माझा पुण्याचा मठ चालत' अशा प्रकारची ऑफरही त्याने दिली.
दरम्यान, २३ ऑगस्ट २०२४ रोजी नाशिकला पंचवटी परिसरात भेटीस बोलावून पीडितेला त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजवर नेले. माझ्याकडे दैवी शक्ती आहे, तू विरोध करू शकणार नाही अशी भीती दाखवत संबंध ठेवले. तसेच तिचे विवस्त्र फोटो काढून धमकी दिल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
पुरावे जबरदस्तीने केले डिलीट
लैंगिक छळामुळे पीडित महिला मानसिक धक्क्यात होती. कुटुंबीयांच्या भीतीमुळे आणि संशयित आरोपीच्या प्रभावामुळे तिने तक्रार देण्याचे टाळले. संशयित आरोपीने तिचे मोबाइलमधील पुरावेही जबरदस्तीने डिलीट केल्याचे समोर आले आहे. सदर बाबा हा विवाहित असल्याचे सांगितले जाते. पीडितेचे लग्न झाले. बाबाचा खूप मोठ्या लोकांशी संपर्क असल्याने आपल्याला न्याय मिळणार नाही या भीतीने तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत वाच्यता केली नाही. यापूर्वी पीडितेने आडगाव पोलिस ठाण्यात धाव घेतली होती परंतु घटनेचे कार्यक्षेत्र नसल्याचे सांगत पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.
'अंनिस'च्या पुढाकाराने तक्रार
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पीडितेला धीर दिल्यानंतर तिने अखेर पुढे येत लासलगाव पोलिस ठाणे गाठले. यावेळी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, कोमल वर्दे आणि अॅड. स्वाती तेलगोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीडित महिलेने पोलिसांसमोर आपबिती कथन केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनेची पडताळणी करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर भोंदूबाबा विरोधात भारतीय दंडसंहिता २०२३ अंतर्गत बलात्कारासह महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंधक कायदा २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या भोंदू महाराजाने अशाच प्रकारे इतर महिलांनाही जाळ्यात ओढून लैंगिक शोषण केले असण्याची शक्यता अंधश्रद्धा निर्मूलन समितीने व्यक्त केली आहे.
Web Summary : Nashik: A woman accused a godman, Mahesh Kakade, of sexual assault in the name of exorcism. He allegedly exploited her mental state, took nude photos, and threatened her. Police have registered a case.
Web Summary : नाशिक: एक महिला ने महेश काकड़े नामक एक ढोंगी बाबा पर भूत भगाने के नाम पर यौन उत्पीड़न का आरोप लगाया। उस पर महिला की मानसिक स्थिति का फायदा उठाने, नग्न तस्वीरें लेने और धमकाने का आरोप है। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है।