FD Scam News: हरियाणातील पंचकुला नगरपालिकेच्या मुदत ठेवीशी (FD) संबंधित सुमारे १४५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं (ED) गुरुवारी मोठी कारवाई केली. मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले असून बुधवारी चंदीगड, पंचकुला (हरियाणा), तसंच पंजाबमधील झिरकपूर, डेराबस्सी आणि राजपुरा अशा सुमारे डझनभर ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली.
अनेक अधिकाऱ्यांच्या ठिकाणांची झडती
या कारवाईदरम्यान ईडीनं बँकेचे माजी डेप्युटी व्हाईस प्रेसिडेंट पुष्पेंद्र सिंह, माजी कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर दिलीप कुमार राघव आणि नगरनिगमचे माजी वरिष्ठ लेखा अधिकारी विकास कौशिक यांच्यासह अन्य व्यक्तींच्या ठिकाणांची झडती घेतली. या शोधमोहिमेत अनेक आक्षेपार्ह कागदपत्रं जप्त करण्यात आल्याचं एजन्सीनं सांगितलं . विशेष म्हणजे, हरियाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) यापूर्वीच पुष्पेंद्र सिंह आणि दिलीप राघव यांच्यासह सहा जणांना अटक केलीये. कोटक महिंद्रा बँकेच्या काही अज्ञात अधिकाऱ्यांनी, एका पूर्वनियोजित फसवणुकीचा भाग म्हणून, नगरपालिकेच्या निधीचा अपहार करण्याचा कट रचला, असा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
अशा प्रकारे रचला होता गुन्हेगारी कट
ईडीच्या प्राथमिक तपासानुसार, नगरपालिकेचे अधिकारी, बँक कर्मचारी आणि काही खाजगी व्यक्तींनी संगनमतानं सरकारी निधीचा अपहार केला. तपासात असं समोर आलं की, दिलीप राघव आणि पुष्पेंद्र सिंह यांनी विकास कौशिकच्या मदतीनं बनावट कागदपत्रांच्या आधारे पंचकुला नगरपालिकेच्या नावानं दोन बनावट बँक खाती उघडली. त्यानंतर, बनावट परवानगी पत्रांद्वारे मूळ खात्यांमधील पैसे या अनधिकृत खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले.
बनावट ईमेल आणि एफडी रिसिटचा वापर
बँक अधिकाऱ्यांनी बनावट ईमेल आयडीचा वापर करून या व्यवहारांना मंजुरी दिली. या खात्यांमधील पैसे नंतर रजत दहडा, स्वाती तोमर, कपिल कुमार आणि विनोद कुमार यांसारख्या फायनान्सर्सना पाठवण्यात आले. हा पैसा पुढे पुन्हा पुष्पेंद्र सिंह आणि त्याची पत्नी प्रीति ठाकुर यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचा आरोप ईडीनं केलाय. याशिवाय, काही रक्कम रिअल इस्टेट कंपन्या आणि खाजगी व्यक्तींनाही ट्रान्सफर करण्यात आली. आरोपींनी नगरपालिकेला १४५.०३ कोटी रुपयांची गुंतवणूक आणि १५८.०२ कोटी रुपयांचे मॅच्युरिटी मूल्य दर्शवणाऱ्या १६ बनावट मुदत ठेव पावत्या (Fake FD Receipts) देऊन त्यांची दिशाभूल केली.
Web Summary : ED raids unearth a ₹145 crore FD scam involving Haryana municipality funds. Officials allegedly created fake accounts, diverting funds via forged documents. Raids targeted bank officials and others, seizing incriminating documents. Several arrests have already been made in the case.
Web Summary : ईडी के छापों में हरियाणा नगरपालिका निधि से जुड़े ₹145 करोड़ के एफडी घोटाले का खुलासा हुआ। अधिकारियों ने कथित तौर पर जाली खाते बनाए, जाली दस्तावेजों के माध्यम से धन को डायवर्ट किया। बैंक अधिकारियों और अन्य को लक्षित किया गया, आपत्तिजनक दस्तावेज जब्त किए गए। मामले में कई गिरफ्तारियां पहले ही हो चुकी हैं।