Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 09:33 IST

या दांपत्यानं नुकतेच युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ऑस्टिनला ६,९०० कोटी रुपये दान देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी त्यांनी मुलांच्या भविष्यासाठी सुमारे ५२,००० कोटी रुपये देण्याचा संकल्प केला होता.

डेल टेक्नॉलॉजीजचे (Dell Technologies) संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले मायकल डेल आणि त्यांची पत्नी सुसान डेल सध्या त्यांच्या दातृत्वामुळे चर्चेत आहेत. या दांपत्यानं नुकतेच युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ऑस्टिनला ६,९०० कोटी रुपये (७५० मिलियन डॉलर) दान देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी त्यांनी मुलांच्या भविष्यासाठी ६.२५ अब्ज डॉलर (सुमारे ५२,००० कोटी रुपये) देण्याचा संकल्प केला होता. मायकल डेल हे याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी आतापर्यंत या विद्यापीठाला ९,२०० कोटी रुपयांहून अधिक देणगी दिली आहे.

देशातील पहिलं ‘एआय-नेटिव्ह’ रुग्णालय उभारणार

फोर्ब्सच्या मते, मायकल डेल यांची नेटवर्थ सुमारे १७० अब्ज डॉलर आहे. सुसान डेल या 'मायकल अँड सुसान डेल फाउंडेशन'च्या माध्यमातून आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात अनेक दशकांपासून सक्रिय आहेत. या दांपत्यानं युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ऑस्टिनला मेडिकल सेंटर (UT Dell Medical Center) उभारण्यासाठी ही देणगी दिली आहे. ३०० एकरमध्ये पसरलेलं हे रिसर्च कॅम्पस देशातील पहिले ‘एआय-नेटिव्ह’ रुग्णालय असेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) माध्यमातून रुग्णांच्या गुंतागुंतीच्या आजारांवर अचूक उपचार शोधणं आणि वैद्यकीय संशोधनाचा वेग वाढवणे हे याचं उद्दिष्ट आहे. हा प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा

हॉस्टेलच्या खोलीतून सुरू झाला डेलचा प्रवास

मायकल डेल यांचा जन्म २३ फेब्रुवारी १९६५ रोजी ह्युस्टन, टेक्सास येथे झाला. त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास ऑस्टिनमध्ये प्रवेश घेतला, परंतु पदवी पूर्ण केली नाही. १९८४ मध्ये वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी आपल्या कॉलेजच्या हॉस्टेलमधील खोलीतून कस्टमाइज्ड कॉम्प्युटर बनवून विकण्यास सुरुवात केली. तंत्रज्ञानाच्या सखोल माहितीमुळे त्यांच्या या छोट्या स्टार्टअपला मोठी गती मिळाली आणि त्यांनी कॉलेज अर्धवट सोडून पूर्ण वेळ व्यवसायाला देण्याचा निर्णय घेतला.

व्यवसाय क्षेत्रातील यशस्वी रणनीती

मायकल डेल यांची सर्वात मोठी ताकद त्यांची 'डायरेक्ट-टू-कस्टमर' बिझनेस रणनीती होती. ज्या काळात कॉम्प्युटर मध्यस्थींमार्फत विकले जायचे, त्या काळात डेल यांनी थेट ग्राहकांना उत्पादनं विकण्यास सुरुवात केली. यामुळे मध्यस्थींचं कमिशन वाचलं आणि खर्च कमी झाला, परिणामी ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार 'कस्टमाइज्ड' पीसी मिळू लागले.

English
हिंदी सारांश
Web Title : Michael & Susan Dell donate billions to hospital, children's causes.

Web Summary : Michael and Susan Dell donated ₹6,900 crore to the University of Texas for a new AI-native hospital. Previously, they pledged ₹52,000 crore for children's welfare. Dell, a UT alumnus, revolutionized the PC market with his direct-to-customer strategy, building Dell Technologies from his dorm room.
टॅग्स :व्यवसायपैसा