पती-पत्नी ही संसार रथाची दोन चाकं असतात, असे म्हटले जाते. मात्र, याच नात्याला काळिमा फासणाऱ्या घटना सध्या सातत्याने समोर येत आहेत. असेच एक धक्कादायक प्रकरण गाजीपूरमधून समोर आले आहे. पत्नीच्या धमकीमुळे गाजीपूरमध्ये राहणाऱ्या एका शिक्षकाने आपले आयुष्य संपवले आहे. या शिक्षकाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
१६ मे रोजी उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातील सदर कोतवाली अंतर्गत अंधौ गावात एका पुरूषाचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळला. स्थानिकांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह झाडावरून खाली उतरवला. पोलिसांनी मृतदेहाची तपासणी केली असतं, सदर व्यक्तीच्या खिशात मोबाईल फोन आढळला. मोबाईल फोनच्या माध्यमातून अनेक प्रकारची गुपिते उघडकीस आली आहेत. मृत व्यक्तीचे नाव कोविद कुमार असून, तो सीतापूर जिल्ह्यातील रहिवासी होता आणि सहाय्यक शिक्षक म्हणून काम करत होता, असे उघड झाले आहे.
पत्नीने धमकी दिली अन्...
मृत शिक्षक कोविद कुमार यांचे लग्न २०२३मध्ये गाजीपूर येथील रहिवासी लक्ष्मी कुशवाह यांच्याशी झाले होते. लग्नानंतर लक्ष्मी तिचा पती कोविंद आणि त्याच्या कुटुंबासोबत राहत होती. लग्नाच्या काही दिवसांनंतर लक्ष्मीने कोविदचा संपूर्ण पगार आपल्या ताब्यात घेण्यास सुरुवात केली. त्या पैशातून ती तिच्या पालकांचा आणि स्वतःचा खर्च भागवू लागली. लक्ष्मीला पैशांची उधळपट्टी करण्याची सवय होती. कोविदच्या पगारचे सगळे पैसे असेच संपून जात होते. कोविदने जेव्हा या सगळ्याला विरोध केला, तेव्हा लक्ष्मीने त्याच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली खटला दाखल केला. यामुळे कोविदला गाजीपूर न्यायालयात हजर राहावे लागणार होते.
साक्ष देण्याच्या बदल्यात मागितले २५ लाख
या प्रकरणी १६ मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार होती. या सुनावणीसाठी कोविद त्याची पत्नी, मेहुणा, मेहुणी आणि इतरांसह ट्रेनने गाजीपूरला पोहोचला होता. पत्नीला न्यायालयात साक्ष द्यायची होती. पण, साक्ष देण्याच्या बदल्यात तिने कोविदकडे २५ लाख रुपयांची मागणी केली. कोविदने आपल्याकडे इतके पैसे नसल्याचे पत्नीला सांगितले. यावर त्याची पत्नी म्हणाली की, 'तू मेलास तर बरे होईल, निदान मला तरी नोकरी मिळेल.' पत्नीच्या तोंडून असे शब्द ऐकून कोविद मनातून खचून गेला. कोर्टात जाण्याऐवजी तो घटनास्थळी पोहोचला आणि तिथे गेल्यानंतर त्याने प्रथम एक व्हिडीओ बनवला आणि तो फेसबुकवर अपलोड केला. यानंतर त्याने गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले.
पत्नीनेच सांगितलं मरून जा...
कोविदच्या वडिलांनी सांगितले की, कोविद सहाय्यक शिक्षक होता. पण, एका पायाने अपंग होता. त्यामुळे त्याच्या एका ओळखीच्या व्यक्तीने त्याचे लग्न एका गरीब कुटुंबातील मुलीशी लावून दिले. लग्नानंतर, कुटुंबाची काळजी घेण्याऐवजी, लक्ष्मीने त्याचा छळ करायला सुरुवात केली आणि त्याचा सगळा पगार काढून घेतला. जेव्हा कोविदने यासाठी नकार दिला, तेव्हा तिने हुंड्यासाठी छळासह अनेक प्रकारचे खटले दाखल केले. शेवटी साक्ष देण्याच्या बदल्यात २५ लाख रुपयांची मागणी केली. लक्ष्मीनेच कोविदला म्हटले होतेकी, जर तो पैसे देऊ शकत नसेल तर, त्याने मरावे. कारण त्यानंतर तिला नोकरी मिळणार होती. आता कोविदच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून संबंधित कलमांखाली लक्ष्मीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलीस पुढील कारवाई करण्यात व्यस्त आहेत.