१ हजाराच्या बदल्यात द्यायचे २ हजार; गडचिरोलीत बनावट नोटांचा बाजार, इंजिनिअर भावंडांचा कारनामा
By संजय तिपाले | Updated: May 18, 2026 23:02 IST2026-05-18T23:01:20+5:302026-05-18T23:02:31+5:30
मोबाइलमधील व्हॉट्सॲप चॅटने उलगडले रॅकेटचे गुपित

१ हजाराच्या बदल्यात द्यायचे २ हजार; गडचिरोलीत बनावट नोटांचा बाजार, इंजिनिअर भावंडांचा कारनामा
गडचिरोली: बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये १०० रुपयांच्या बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न फसल्याने उघडकीस आलेल्या बनावट नोटा छापणाऱ्या हायटेक रॅकेटमध्ये इंजिनिअर भावंडांचा समावेश आहे. बनावट नोटा छापून चलनात आणण्यासाठी त्यांनी एक हजार रुपयांच्या बदल्यात दोन हजार किमतीच्या बनावट नोटा देण्याचा सपाटा लावला होता. त्यांच्याकडे आढळलेल्या व्हॉट्सअपमधील चॅटवरून या रॅकेटचे गुपित उलगडल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
शहरातील कारगिल चौकातील एटीएममध्ये ११ मे रोजी घडलेल्या या प्रकारानंतर गडचिरोली पोलिस आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने वेगाने सूत्रे हलवली. प्रमोद कोवे आणि आरमोरी रोडवरील पानटपरी चालक आदित्य रेचनकर या दोघांना बेड्या ठोकल्यानंतर या प्रकरणाचे 'नागपूर कनेक्शन' समोर आले. नागपुरात राणा प्रतापनगर ठाण्याच्या हद्दीतील भाड्याचा फ्लॅट घेऊन बिनबोभाटपणे बनावट नोटांची छपाई करणाऱ्या डोईजड बंधूंच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ताब्यात घेतलेल्या लॅपटॉप आणि मोबाइलच्या तपासणीत पोलिसांच्या हाती व्हॉट्सॲप चॅटचे मोठे घबाड लागले आहे. त्यावरून सध्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविण्यास सुरुवात केल्याचे सूत्रांनी सांगितले.
व्हॉट्सॲपवर चालायचे 'डिलिंग'चे गणित
अटक करण्यात आलेला मयूर हा स्थापत्य अभियंता आहे, तर आदित्य मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. आपल्या तांत्रिक आणि डिजिटल कौशल्याचा वापर त्यांनी थेट बनावट नोटांच्या छपाईसाठी केला. कोणाला, कधी आणि किती नोटा पुरवायच्या, याचे संपूर्ण नियोजन व्हॉट्सॲपवर केले जात होते. बाजारात ५०, १०० आणि २०० च्या बनावट नोटा खपवण्यासाठी त्यांनी आपल्या मित्रांनाच एजंट बनविल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
चार वर्षांत किती नोटांची छपाई, चौकशी सुरू
सध्या डोईजड बंधूंसह तिघे जण ६ दिवसांच्या पोलिस कोठडीत असून, त्यांनी या ४ वर्षांत नेमक्या किती लाख रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खेळवल्या, हा पैसा कुठे पांढरा केला, याचा कसून तपास सुरू आहे. या व्हॉट्सॲप चॅटच्या 'कुंडली'वरून येत्या दोन-तीन दिवसांत आणखी काही जणांना पोलिसांकडून बेड्या ठोकल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणात चारही आरोपी कोठडीत आहेत, त्यांनी किमी नोटा छापल्या, किती बाजारात आणल्या याबाबत कसून चौकशी केली जात आहे.
- अनिकेत हिरडे, सहायक पोलिस अधीक्षक, गडचिरोली
आईच्या कष्टावर मुलांनी फिरविले पाणी
मयूर व आदित्य डोईजड ही भावंडे लहान असताना त्यांच्या डोक्यावरील पितृछत्र हरपले. कृषी उत्पन्न बाजार समितीत लिपिक असलेल्या आईने मोठ्या कष्टाने संसाराचा गाडा पुढे ओढला. मयूरला अभियंता बनवून त्याचे लग्न लावून देत संसार उभा केला, तर आदित्य याचेही अभियांत्रिकीचे शिक्षण सुुरू होते. मात्र, झटपट श्रीमंतीच्या नादात भावंडे भरकटली आणि ऐन उमेदीच्या वयात कायद्याच्या कचाट्यात अडकली, त्यामुळे आईने डोंगराएवढे दु:ख बाजूला सारून आयुष्यभर केलेल्या कष्टावर पाणी फेरले गेले.