"त्याला तिथेच जळू द्या"; पत्नीची क्रूरता, आगीत होपरळलेल्या पतीने मृत्यूपूर्वी उघड केलं सासरच्यांचं खरं रुप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 18:00 IST2026-05-19T17:47:17+5:302026-05-19T18:00:37+5:30

दिल्लीत एका तरुणाचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Delhi Horror Man Allegedly Burned Alive by Wife and Mother in Law After Domestic Dispute | "त्याला तिथेच जळू द्या"; पत्नीची क्रूरता, आगीत होपरळलेल्या पतीने मृत्यूपूर्वी उघड केलं सासरच्यांचं खरं रुप

"त्याला तिथेच जळू द्या"; पत्नीची क्रूरता, आगीत होपरळलेल्या पतीने मृत्यूपूर्वी उघड केलं सासरच्यांचं खरं रुप

Delhi Crime: दिल्लीच्या महेंद्रा पार्क परिसरातील एका इमारतीमध्ये सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक भयानक घटना घडली. एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून अचानक आगीच्या मोठ्या ज्वाळा उठताना दिसल्या. प्रत्यक्षदर्शिनी दिलेल्या माहितीनुसार, एक तरुण आगीच्या विळख्यात सापडला होता. तो ओरडत इमारतीच्या पायऱ्यांवरून खाली धावत आला आणि खाली कोसळला. आगीची तीव्रता इतकी भीषण होती की, त्याचे कपडे पूर्ण जळून खाक झाले होते. स्थानिकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याच्या अंगावर पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.

पत्नी आणि सासूवर गंभीर आरोप

या घटनेत गंभीररित्या होरपळलेल्या तरुणाचे नाव दीपांश चौधरी असे आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या घरमालकाने सांगितले की, आग विझवल्यानंतर दीपांश सुमारे १० मिनिटे तिथेच पडून होता. यादरम्यान पोलीस ठाण्यातून एक अधिकारी पोहोचला आणि त्याने दीपांशचा मृत्यूपूर्वीचा जबाब आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला.

या जबाबात दीपांशने आरोप केला की, माझी पत्नी आणि सासूने मिळून मला जाणीवपूर्वक आग लावली आहे. या कामात त्यांनी इतर २ ते ३ जणांची मदत घेतली होती. यासोबतच त्याने पत्नीचे इतर २ ते ३ पुरुषांसोबत अनैतिक संबंध असल्याचाही गंभीर आरोप केला. धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा घरमालकाने दीपांशच्या पत्नीला या घटनेची माहिती दिली, तेव्हा तिने खाली येण्यास स्पष्ट नकार दिला आणि त्याला तिथेच जळू द्या असे उत्तर दिले.

रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू

माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी दीपांशला तात्काळ बाबू जगजीवन राम मेमोरियल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तो प्रचंड प्रमाणात भाजला असल्याने उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

कौटुंबिक वादाची पार्श्वभूमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपांश आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वैवाहिक वाद सुरू होता. या वादाप्रकरणी आधी तक्रारही दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक अहवाल आणि मृत दीपांशचा जबाब (मृत्यूपूर्व तक्रार) या सर्वांचा  अभ्यास केला जात आहे. या प्रकरणाची हत्या, आत्महत्या आणि कौटुंबिक हिंसाचार अशा सर्व बाजूंनी चौकशी सुरू असून, तपासानुसार पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

पत्नी, सासू आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून दीपांशला जिवंत जाळल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पत्नी आणि सासूला ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. घटना घडली त्या दिवशीही पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झाले होते. यादरम्यान दीपांशने आत्महत्येची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने पत्नीच्या घराबाहेर स्वतःवर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहन केल्याचाही संशय पोलिसांना आहे.

Web Title: Delhi Horror Man Allegedly Burned Alive by Wife and Mother in Law After Domestic Dispute