हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळली! निर्दयी सासूला जन्मठेप; न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:56 IST2026-01-30T12:51:22+5:302026-01-30T12:56:17+5:30

अवघ्या ५० हजार रुपयांसाठी सुनेला जिवंत जाळणाऱ्या निर्दयी सासूला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे.

Daughter-in-law burned alive for dowry! Ruthless mother-in-law sentenced to life imprisonment; Historic court verdict | हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळली! निर्दयी सासूला जन्मठेप; न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळली! निर्दयी सासूला जन्मठेप; न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथेने पुन्हा एकदा एका विवाहितेचा बळी घेतला, मात्र कायद्याच्या कचाट्यातून गुन्हेगार सुटू शकले नाहीत. अवघ्या ५० हजार रुपयांसाठी सुनेला जिवंत जाळणाऱ्या निर्दयी सासूला गाजीपूर जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. विशेष म्हणजे, मृत्यूशी झुंज देत असताना पीडित महिलेने दिलेल्या मृत्युपूर्व जबानीच्या आधारावर न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला.

नेमके प्रकरण काय?

दुर्गखुशी गावातील वीरेंद्र गोड यांची मुलगी संध्या हिचा विवाह २०१५ मध्ये कासिमाबाद येथील मनीष गोड याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सुखात गेल्यानंतर सासरच्या मंडळींनी ५० हजार रुपयांच्या हुंड्यासाठी संध्याचा छळ सुरू केला. गरीब माहेरच्यांना ही रक्कम देणे शक्य नव्हते. ६ ऑक्टोबर २०२० रोजी हा छळ टोकाला पोहोचला. सासू बिंदू देवी, दीर आणि नणंदेने मिळून संध्याला जिवंत जाळले आणि घराला कुलूप लावून फरार झाले.

मृत्युपूर्व जबाब ठरला कळीचा मुद्दा

गंभीर भाजलेल्या अवस्थेत गावकऱ्यांनी संध्याला मऊ येथील रुग्णालयात दाखल केले. मृत्यू समोर दिसत असतानाही संध्याने हिंमत हारली नाही. दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेल्या आपल्या शेवटच्या जबानीत तिने पतीला निर्दोष मुक्त केले, मात्र सासू, नणंद आणि दिराचे क्रूर कृत्य जगासमोर मांडले. या जबाबाच्या काही वेळातच तिची प्राणज्योत मालवली.

न्यायालयाचा निकाल

साहाय्यक शासकीय अधिवक्ता अवधेश सिंह यांनी न्यायालयात १० साक्षीदार आणि संध्याचा मृत्युपूर्व जबाब पुरावा म्हणून सादर केला. सुमारे ५ वर्षे, ३ महिने आणि २२ दिवस हा खटला चालला. सर्व पुरावे आणि साक्ष तपासून अतिरिक्त सत्र न्यायाधीश अलख कुमार यांनी सासू बिंदू देवीला दोषी ठरवून जन्मठेप आणि २५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.

या प्रकरणातील दीर आणि नणंद हे अल्पवयीन असल्याने त्यांचा खटला बाल न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. तर, पत्नीने आपल्या जबाबात पतीचा उल्लेख न केल्याने न्यायालयाने पती मनीष गोड याची निर्दोष मुक्तता केली.

Web Title : दहेज के लिए बहू को जिंदा जलाने पर सास को आजीवन कारावास

Web Summary : दहेज के लिए महिला को जिंदा जलाया। सास को आजीवन कारावास। पीड़िता का मृत्युपूर्व बयान अहम। पति बरी; नाबालिग आरोपी किशोर न्यायालय में पेश।

Web Title : Mother-in-law Jailed for Life for Burning Daughter-in-law Over Dowry

Web Summary : Woman burned alive for dowry. Mother-in-law sentenced to life. Victim's dying declaration crucial. Husband acquitted; siblings face juvenile court.