सरकारी नोकरी लागताच तो प्रेम विसरला, प्रेयसीला दगा दिला; चिडलेल्या तरुणीने चांगलाच इंगा दाखवला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 09:15 IST2025-12-09T09:14:32+5:302025-12-09T09:15:16+5:30
सरकारी नोकरी लागताच त्याने तरुणीला दिलेले लग्नाचे वचन मोडले. गौतम आपल्याला फसवून लग्न करत असल्याचे कळताच तरुणीने..

AI Generated Image
नवरा-नवरी अन् सजलेला मंडप, सगळीकडे साखरपुड्याची धूमधाम सुरू असतानाच भर हॉलमध्ये एका तरुणीची एन्ट्री झाली आणि सगळ्या कार्यक्रमाचा माहोलच बदलून गेला. या तरुणीने अशा काही गोष्टी सांगितल्या की उपस्थित सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. ही घटना उत्तर प्रदेशच्या बिजनौरमध्ये घडली आहे. या भागातील एका तरुणीने दगाबाज बॉयफ्रेंडच्या साखरपुड्यात जाऊन मोठा गोंधळ तर घातलाच, पण सोबतच तिने बॉयफ्रेंडचे कारनामे देखील सगळ्यांना ऐकवले.
या प्रकरणातील प्रेयसी ही छीबरी गावाची असून, तिचे बिजनौरमध्ये राहणाऱ्या या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या तरुणाचे नाव गौतम कुमार असून, तो नुकताच दिल्लीत रेल्वेमध्ये स्टेनोग्राफर पदावर नियुक्त झाला होता. गौतम कुमार याचे लग्न ठरले होते आणि एका आलीशान हॉलमध्ये त्याचा साखरपुडा सुरू होता. जवळपास ३०० लोकांची मेजवानी सुरू असतानाच या हॉलमध्ये तोंडाला मास्क लावून ही तरुणी पोहोचली आणि तिने हंगामा करण्यास सुरुवात केली. या तरुणीने जोरजोरात ओरडून सगळ्यांना तिच्या आणि गौतमच्या नात्याबद्दल सांगितले. इतकंच नाही तर, तिने सगळ्यांना हॉलमधून निघून जाण्यास देखील सांगितले.
अनेक वर्ष सुरू होते नाते अन्..
या तरुणीने सांगितले की, तिची आणि गौतमची ओळख सोशल मीडियाद्वारे झाली होती. हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि प्रेमाची सुरुवात झाली. यानंतर दोघे दिल्लीत स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. जवळपास तीन वर्षे ते दोघे एकत्र राहत होते. गौतमने तिला लग्नाचे वचन देखील दिले होते. लग्न करेन असं म्हणत त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. मात्र, सरकारी नोकरी लागताच त्याने तरुणीला दिलेले लग्नाचे वचन मोडले. गौतम आपल्याला फसवून लग्न करत असल्याचे कळताच तरुणीने त्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
आरोपी गौतम कुमार याच्या विरोधात दाखल केलेल्या या गुन्हाची कोर्टात सुनावणी होणार होती. मात्र, त्या आधीच गौतम साखरपुडा करण्याच्या तयारीत होता. हे कळताच तरुणी थेट हॉलमध्ये पोहोचली. हॉलमध्ये सुरू झालेला हंगामा पाहून हॉलच्या मालकाने पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तरुणीला आणि गौतमसहित त्याच्या कुटुंबाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आता या प्रकरणाची पुढील तपासणी पोलीस करत आहेत.