अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिकच वाढल्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 16:50 IST2021-07-28T16:49:28+5:302021-07-28T16:50:37+5:30
ईडीचे पथक दोन वाहनांतून दाखल झाले असून त्यांनी भुजबळ यांच्या कुटुंबीयांचे जबाब घेतले तसेच कागदपत्रेही तपासल्याची माहिती मिळत आहे.

अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिकच वाढल्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे
मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या राजू भुजबळ यांचे घर अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात आहे. ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) पथक तिथे दाखल झाले आहे. ईडीचे पथक दोन वाहनांतून दाखल झाले असून त्यांनी भुजबळ यांच्या कुटुंबीयांचे जबाब घेतले तसेच कागदपत्रेही तपासल्याची माहिती मिळत आहे.
अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करत असताना ईडीच्या हाती काही कॉल डीटेल्स आणि Whats App चॅट डाटा सापडला असून त्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दरमहा १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता. त्यानंतर याप्रकरणी कोर्टाच्या आदेशाने सीबीआय आणि ईडी यांच्याकडून चौकशी सुरू झाली. आज सीबीआयने मोठी कारवाई करत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि अहमदनगर या शहरांतील १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले असून त्यात दोन बड्या पोलीस अधिकाऱ्यांशी संबंधित ठिकाणांचीही झाडाझडती घेण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सीबीआयने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी एकूण १२ छापे आज टाकले आहेत. यात मुंबई पोलीस दलातील दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या अहमदनगरमधील घरावर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांच्या पुणे येथील घरावर छापा टाकून सीबीआय पथकाने झाडाझडती घेतली आहे.