"माझ्या मुलीसारख्या आहात" म्हणत विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; शिक्षकाला 'पोक्सो' अंतर्गत अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 11:44 IST2026-01-14T11:42:35+5:302026-01-14T11:44:52+5:30
आरोपीचे कुटुंब व्यवस्थापनाला म्हणते, आपल्यात प्रकरण मिटवून घ्या

"माझ्या मुलीसारख्या आहात" म्हणत विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; शिक्षकाला 'पोक्सो' अंतर्गत अटक
छत्रपती संभाजीनगर : तुम्ही माझ्या मुलीसारख्या आहात, असे म्हणत एका शिक्षकानेच विद्यार्थिनींना जवळ घेत अश्लीलरीत्या स्पर्श करायचा. गुटखा खाऊन त्यांच्याजवळ चेहरा न्यायचा, कपड्यांमध्ये चष्मा लटकवून तो काढण्याच्या उद्देशाने पुन्हा आक्षेपार्ह कृत्य करत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सातवीतील एका मुलीने सर्वप्रथम मुख्याध्यापिकेकडे तक्रार केल्यानंतर अन्य मुलींनी बोलण्याची हिंमत केली. खाजी मुजिबोद्दीन नसिरोद्दीन (वय ४०, रा. मेहमुदपुरा, नॅशनल कॉलनी) असे विकृताचे नाव आहे.
एमआयडीसी सिडको ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेच्या मुख्याध्यापिकेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. ८ जानेवारीला शाळेत काही शिक्षक रजेवर असल्याने मुख्याध्यापिकांनी तीन वर्गाचे मुले-मुली एकत्र करून एकाच वर्गात बसवले. त्यांच्याशी गप्पा मारत असताना सर्व विद्यार्थ्यांनी खाजी मुजिबोद्दीन त्यांना सतत विनाकारण मारहाण करत असल्याची तक्रार केली. तेवढ्यात सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलीने मुख्याध्यापिकेकडे एकट्यात बोलण्याची विनंती केली. मुख्याध्यापकांच्या दालनात गेल्यानंतर तिने खाजी मुजिबोद्दीनच्या सर्व कृत्यांचा पाढाच वाचला. तो नेहमी विनाकारण मुलींना जवळ ओढतो, तुम्ही मला मुलीसारख्या आहेत, असे म्हणत अश्लीलरीत्या स्पर्श करतो. गुटखा खाऊन चुंबन घेण्याचेही तो प्रकार करायचा. मुलींनी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला की तो हात पकडून ठेवायचा, असेही तिने सांगितले.
त्यामुळे अन्य मुलींनी बोलण्याची केली हिंमत
सातवीतल्या मुलीचे हे बोलणे ऐकून मुख्याध्यापिका हादरून गेल्या. त्यांनी अन्य मुलींना विश्वासात घेतल्यानंतर सहा मुलींनी खाजी मुजिबोद्दीनचे सर्व कृत्य सांगितले. मुलींच्या कपड्यांमध्ये चष्मा अडकवण्याचे संतापजनक कृत्य तो करत होता, असेही सांगितले. गेल्या वर्षभरापासून तो हे कृत्य करून वाच्यता न करण्यासाठी मुलींना धमकावत होता.
समिती गठित, कुटुंब म्हणते, आपल्यात मिटवून घ्या
मुख्याध्यापिकेने तत्काळ संस्थेच्या वरिष्ठांसह महिला तक्रार निवारण समिती, विद्यार्थी सुरक्षा समितीसमोर हा प्रकार सांगितला. त्यानंतर समिती गठित करून सर्व मुलींकडे पुन्हा याची खात्री करण्यात आली. संस्थेने तत्काळ खाजी मुजिबोद्दीनला खुलासा करण्यास सांगितले. १२ जानेवारीला सायंकाळी ५ वाजता तो कुटुंबासह व्यवस्थापनासमोर हजर झाला. त्यावेळी त्याच्या कुटुंबाने प्रकरण आपल्यात मिटवून घ्या, असे म्हणत त्याच्या कृत्याची पाठराखण केली.
पालकांचा तक्रारीस नकार, मुख्याध्यापिकेची तक्रार
मुलींच्या पालकांनी या प्रकरणात शाळेनेच तक्रार देण्याची मागणी केली. त्यानंतर मुख्याध्यापिकेने मंगळवारी एमआयडीसी सिडको ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांच्याकडे तक्रार केली. त्यावरून रात्री खाजी मुजिबोद्दीन विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून बागवडे यांनी त्याला अटक केली.