पाणी खाजगीकरण; नागरिकांचा उद्रेक
By Admin | Updated: October 7, 2014 00:44 IST2014-10-07T00:31:48+5:302014-10-07T00:44:04+5:30
औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठा यंत्रणेचे खाजगीकरण करून एक महिना उलटत नाही तोच उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे.

पाणी खाजगीकरण; नागरिकांचा उद्रेक
औरंगाबाद : महापालिकेने पाणीपुरवठा यंत्रणेचे खाजगीकरण करून एक महिना उलटत नाही तोच उद्रेक होण्यास सुरुवात झाली आहे. प्रियदर्शिनीनगर, इंदिरानगर या वॉर्डात औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी चांगलाच धडा शिकविला.
मागील आठवड्यापासून त्या भागात पाणीपुरवठा झाला नसल्यामुळे नगरसेवक प्रल्हाद निमगावकर यांनी मनपा आणि कंपनीच्या कर्मचारी, अभियंत्यांना संपर्क केला. मात्र, कुणीही प्रतिसाद दिला नाही. सणासुदीचे दिवस असताना प्रभागात पाणीपुरवठा झाला नसल्यामुळे नगरसेवक निमगावकर यांच्याकडे शेकडो महिला हेलपाटे मारीत होत्या. आज सकाळी पाणीपुरवठा झाला नाही म्हणून महिलांनी नगरसेवकाचे घर गाठले. निमगावकर यांनी मनपा आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठ्याप्रकरणी विचारणा केली. मनपा अभियंत्यांनी कंपनीकडे बोट दाखविले, तर कंपनीच्या अभियंत्यांनी त्यांना काहीही सांगितले नाही. वॉर्डात उपस्थित लाईनमन व इतर कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठ्याप्रकरणी विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त महिला आणि नगरसेवकांनी त्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. यात त्या कर्मचाऱ्याचा मोबाईल खाली पडला. त्या कर्मचाऱ्यांनी जलवाहिनीच्या चावीने तो मोबाईल स्वत:च फोडला आणि नागरिकांनाच धमकी सत्र सुरू केले.
१ तारखेपासून आजपर्यंत दोन दिवस ५-५ तास वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे औरंगाबादकरांना सणासुदीच्या आणि निवडणुकीच्या काळात पाण्यासाठी भटकंती करावी लागली. ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेपासून ढोरकीन बुस्टर पंपाचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे ६ आॅक्टोबर रोजी कुठे कमी दाबाने, तर कुठे उशिरा पाणीपुरवठा झाला, तर काही भागांमध्ये पाणीपुरवठाच झालाच नाही.
पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेचे खाजगीकरण करण्याची मनपाला गरजच नव्हती. जलवाहिनीचे काम करून घेतले असते, तर काय बिघडले असते.
मी कुणालाही मारहाण केलेली नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वत:च मोबाईल फोडला.