बोलके चेहरे अबोल झाले

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-17T23:36:46+5:302014-12-18T00:40:48+5:30

औरंगाबाद : एरव्ही सकाळचा परिपाठ म्हणजे प्रसन्नता देणारा किलबिलाट व चिवचिवाट... परंतु बुधवारचा परिपाठ याला अपवाद ठरला. बोलके चेहरे अबोल झाले. कंठ दाटले.

The vocal faces are gone | बोलके चेहरे अबोल झाले

बोलके चेहरे अबोल झाले

औरंगाबाद : एरव्ही सकाळचा परिपाठ म्हणजे प्रसन्नता देणारा किलबिलाट व चिवचिवाट... परंतु बुधवारचा परिपाठ याला अपवाद ठरला. बोलके चेहरे अबोल झाले. कंठ दाटले. प्रार्थनेनंतर दोन मिनिटांचे मौन पाळून या चिमुरड्यांनी आपल्या सहवेदना त्या दूर देशीच्या काळाच्या पडद्याआड गेलेल्या समवयीन सवंगड्यांसाठी व्यक्त केल्या व शोकमग्न अवस्थेतच वर्गाची वाट धरली.
शीतवातावरणाने अगोदरच शाळा गारठलेल्या होत्या; परंतु बुधवारची सकाळ भावभावनांच्या गोठणबिंदूला पार वळसा घालून पुढे निघाली होती. सिंधी कॉलनीतील किड्स किंगडम इंग्लिश स्कूलचे वातावरणही असेच गोठले होते. बोचऱ्या थंडीत सकाळी शाळेत येताना कधी ‘हिप-हिप हुर्यो’ तर कधी कुणाची टिंगल टवाळी करीत शाळेच्या पायऱ्या गडबडीने चढणारे चिमुरडे बुधवारी काहीसे गंभीर दिसत होते. ना आवाज होता, ना टिंगल. अकाली प्रौढत्व आल्यागत विद्यार्थी शांततेत शाळेकडे जात होते. त्यामुळे वातावरण आपोआपच गंभीर झाले होेते. दूर पाकिस्तानातील एका सैनिकी शाळेत आपल्या समवयीन १३२ मुलांचे पडलेले मृतदेह, किंकाळ्या, गोळीबाराचा सुन्न करणारा आवाज आणि त्यांच्या माता-पित्यांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश काल दिवसभर दूरचित्रवाणीवर दिसत होता. त्याचा स्पष्ट परिणाम या बालमनावर दिसत होता.
सकाळी ८ वाजता शाळेची ‘असेम्ब्ली’ सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत परिपाठादरम्यान दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. नेहमीच्या प्रार्थनेपेक्षा बुधवारच्या प्रार्थनेचे गांभीर्य मुलांच्या चेहऱ्यावर प्रतिबिंबित झाले होते.
राष्ट्रगीतानंतर दोन मिनिटे पाळलेल्या मौनातून बाहेर येताना अनेकांचे उसासे आणि काहींचे दाटलेले हुंदकेही फुटले होते.

Web Title: The vocal faces are gone