रेणापुरात पंचायत समितीच्या ४६ अधिकाऱ्यांचा गावभेटी कार्यक्रम

By Admin | Updated: June 18, 2014 01:42 IST2014-06-18T00:56:19+5:302014-06-18T01:42:24+5:30

रेणापूर : शासनाच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात तालुक्यातील पंचायत समितीच्या ४६ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावभेटी कार्यक्रम हाती घेऊन यशस्वीरीत्या राबविला.

Village program for 46 officers of Panchayat Samiti in Renapur | रेणापुरात पंचायत समितीच्या ४६ अधिकाऱ्यांचा गावभेटी कार्यक्रम

रेणापुरात पंचायत समितीच्या ४६ अधिकाऱ्यांचा गावभेटी कार्यक्रम

रेणापूर : शासनाच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात तालुक्यातील पंचायत समितीच्या ४६ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावभेटी कार्यक्रम हाती घेऊन त्या-त्या गावांत मुक्काम करून गावातील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यावर भर देऊन शासनाचा प्रवेशोत्सव कार्यक्रम यशस्वीरीत्या राबविला.
शाळेत प्रवेश घेताना बालकांना उत्साही व आनंददायी वातावरण दिसले तर त्याचा शाळेकडील ओढा अधिक वाढेल. त्याअनुषंगाने शाळा सुरू होण्याच्या प्रथम दिवशी १५ जून २०१४ रोजी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशोत्सव या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील प्रत्येक गावात अधिकारी व कर्मचारी १५ जूनला मुक्कामी होते. त्या मुक्कामात गावाकडील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी घरोघरी भेटी देऊन शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन शालेय परिसर स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, शालेय पोषण आहार, स्कॉलरशीप परीक्षा, वृक्षारोपण, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, कृमिक पुस्तके, विद्यार्थी संख्या, साक्षर भारत आणि नियोजन, शाळेत येणाऱ्या मुलांचे स्वागत, शिवाय प्रभातफेरी काढून उपरोक्त कार्यक्रम राबविला गेला.
कार्यक्रम राबविण्यासाठी गटविकास अधिकारी शाम पटवारी, सहाय्यक गटविकास अधिकारी शिवाजी येमुलवाड, गटशिक्षणाधिकारी ए.आर. भंडारी, बालविकास प्रकल्पाधिकारी आर.डी. तुबाकले, उपविभागीय अभियंता व्ही.एस. रबशेट्टी, विस्तार अधिकारी एस.जी. पुठ्ठेवाड, बी.पी. तेलंग, कृषी विस्तार अधिकारी बी.बी. सूर्यवंशी, शिक्षण विस्तार अधिकारी ए.व्ही. होळीकर, सुनापे यांच्यासह ४६ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी त्या-त्या गावांत मुक्कामी राहून शासनाचा उपक्रम गावा-गावांत राबविला.
सांगवी येथे गटविकास अधिकारी शाम पटवारी यांनी केलेल्या मुक्कामात गावातील शाळा व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन गावातील अडीअडचणी जाणून घेतल्या. शिवाय, शासनाच्या योजना गावकऱ्यांना समजावून सांगून प्रत्येक मूल शाळेत कसे जाईल, यावर भर दिला. सांगवी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने गावातील मध्यवर्ती भागातून प्रभातफेरी काढून आपली मुले शाळेत पाठवा, अशा जयघोषात विद्यार्थी वाढविण्यासाठी शाळेच्या वतीने प्रयत्न करण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Village program for 46 officers of Panchayat Samiti in Renapur