छत्रपती संभाजीनगरात अघोषित लोड शेडिंग; संतप्त नागरिक धडकले महावितरण कार्यालयावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 11:57 IST2025-04-26T11:56:14+5:302025-04-26T11:57:01+5:30

ऐन उन्हाळ्यात रात्री अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले होते.

Unannounced load shedding in Chhatrapati Sambhajinagar; Angry citizens stormed the Mahavitaran office | छत्रपती संभाजीनगरात अघोषित लोड शेडिंग; संतप्त नागरिक धडकले महावितरण कार्यालयावर

छत्रपती संभाजीनगरात अघोषित लोड शेडिंग; संतप्त नागरिक धडकले महावितरण कार्यालयावर

छत्रपती संभाजीनगर : गेल्या चार दिवसांपासून सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने सुधाकरनगरच्या साउथ रिपब्लिक सोसायटीच्या संतप्त नागरिकांनी शुक्रवारी रात्री १० वाजता गोलवाडी येथील महावितरण कार्यालय गाठत अधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.

मागील चार ते पाच दिवसांपासून सातारा परिसरातील सुधाकरनगर, साउथ रिपब्लिक सोसायटी, एसआरपीएफ कँप, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, ईटखेडा भागांत वीजपुरवठा खंडित होत आहे. दिवसातून किमान चार ते पाच वेळा तासन्तास अघोषित लोड शेडिंग सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात रात्री अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिक हैराण झाले होते. यामुळे मंगेश चव्हाण, भाऊराव वानखेडे, योगेश पाटील, संतोष माळे, दीपक तुपे, गिरीश रगडे, कुणाल गायकवाड, अमृत झिने, सुमित कांगरे, आदींसह संतप्त नागरिक शुक्रवारी रात्री १० वाजता गोलवाडीतील महावितरण कार्यालयावर धडकले. सततच्या वीजपुरवठा खंडित होण्याबाबत त्यांनी जाब विचारताच कर्मचाऱ्यांची उत्तरे देताना तारांबळ उडाली.

नियोजनाचा अभाव
नागरिकांनी वीजपुरवठ्याच्या नियोजनाबाबत विचारणा केल्यावर ही महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कागदावर नियोजन दाखवता आले नाही. यामुळे महावितरणचा बेजबाबदारपणा समोर आला. महावितरणकडून जाणीवपूर्वक सातारा, देवळाई, इटखेडा, कांचनवाडी, नक्षत्रवाडीत वीजपुरवठा खंडित होत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला. नागरिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर साउथ रिपब्लिक सोसायटीचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला.

Web Title: Unannounced load shedding in Chhatrapati Sambhajinagar; Angry citizens stormed the Mahavitaran office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.