शेतीची कामे करत असताना दोन शेतकऱ्यांवर मृत्यू ओढवला; छ. संभाजीनगर जिल्ह्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 15:06 IST2025-07-01T14:28:27+5:302025-07-01T15:06:30+5:30
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

शेतीची कामे करत असताना दोन शेतकऱ्यांवर मृत्यू ओढवला; छ. संभाजीनगर जिल्ह्यातील घटना
छत्रपती संभाजीनगर: पेरणी झाल्यानंतर वखरणीसह इतर कामांमध्ये शेतकरी गुंतलेला आहे. यातच जिल्ह्यातील आंबेवाडी आणि खंडाळा येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन शेतकऱ्यांचा शेतात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार आणि सोमवारी घडली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने शेतकऱ्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आंबेवाडी शिवारात विद्युत धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
गंगापूर : विद्युत धक्का लागून शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शहराजवळ पालिका हद्दितील आंबेवाडी शिवारात सोमवारी (दि.३०) सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली. अशोक पंढरीनाथ गव्हाणे (वय ४५, रा.आंबेवाडी) असे विद्युत धक्का लागून मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
शेतकरी अशोक गव्हाणे हे सोमवारी दुपारी आपल्या शेतात वखरणी करीत होते. याच वेळी त्यांच्या उसाला पाणीही चालू होते. मात्र, दुपारी अडीचच्या सुमारास मोटर बंद पडल्याने ते पाहण्यासाठी गेले असता, विद्युत प्रवाह उतरलेल्या खांबाच्या तानाला स्पर्श होऊन त्यांना जोराचा विजेचा धक्का बसून ते जागेवरच कोसळले. बराच वेळ त्यांचा वखर बैलासह उभा असल्याने शेजारी व कुटुंबियांनी तेथे जाऊन पाहिले असता, ते बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तात्काळ रुग्णवाहिका चालक शुभम वाघमारे यांनी येथील गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. रात्री उशिरा त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, असा परिवार आहे.
मुलगा दिंडीत अन् इकडे कुटुंबावर शोककळा...
अशोक गव्हाणे यांचे कुटुंबीय वारकरी आहे. यंदा त्यांचा लहान मुलगा आणि भाऊ हे आळंदीच्या दिंडीत सहभागी झाले होते. मात्र, अशोक यांच्या दुर्दैवी मृत्यूने त्या दोघांना दिंडीतून माघारी परतावे लागले.
विहिरीत पडून शेतकऱ्याचा मृत्यू
वैजापूर: तालुक्यातील खंडाळा येथील एका शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. अरुण जगन्नाथ सोनवणे (वय ५५ वर्षे) असे मयताचे नाव आहे. खंडाळा येथील गट नंबर ६१३ मधील विहिरीवर अरुण सोनवणे हे विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरून विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.